इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नवी दिल्लीः केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याविषयी आक्षेपार्ह टिप्पणी केल्याप्रकरणी दाखल करण्यात आलेल्या मानहानीच्या दाव्यात खासदार राहुल गांधी यांना न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. उत्तर प्रदेशमधील सुलतानपूर येथील जिल्हा न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. राहुल यांच्याविरोधात २०१८ मध्ये तक्रार करण्यात आली होती.
राहुल यांना मानहानीच्या या खटल्यात समन्स बजावम्यात आले होते. ते न्यायालयात हजर झाले होते. गांधी यांच्याकडून न्यायालयात दाखल करण्यात आलेला जामीनअर्ज मंजूर करण्यात आला आहे. राहुल हे निरापराध असून त्यांनी बदनामीकारक वक्तव्य केलेले नाही, असे त्यांच्या वकिलांनी सांगितले.
भारतीय दंड संहितेच्या कलम ५०० अंतर्गत हा गुन्हा जामीनपात्र आहे. त्यामुळे त्यांना जामीन मंजूर करण्यात आला. भाजपाचे नेते विजय मिश्रा राहुल यांच्याविरोधात मानहानीची तक्रार दाखल केली होती. मुंबईतील सीबीआयच्या विशेष न्यायालयाने २००५ सालच्या बनावट एन्काऊंटर प्रकरणात अमित शाह यांना दोषमुक्त केल्यानंतरही राहुल यांनी त्यांच्याविरोधात वक्तव्य केले होते.