इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
लखनऊः तृणमुल काँग्रेस, आपसह इतर पक्षांना काडीमोड घेतल्यानंतर उत्तर प्रदेशात समाजवादी पक्ष आणि काँग्रेसमध्ये युती होणार नाही. समाजवादी पक्ष आणि काँग्रेसमध्ये जागांबाबत एकमत झाले नाही.
समाजवादी पक्षाने १७ जागा काँग्रेसला सोडण्याचा प्रस्ताव दिला होता. यापूर्वी समाजवादी काँग्रेस फक्त ११जागा द्यायला तयार होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, समाजवादी पक्षाने अमेठी, रायबरेली, बाराबंकी, सीतापूर, कैसरगंज, वाराणसी, अमरोहा, सहारनपूर, गौतम बुद्ध नगर, गाझियाबाद, बुलंदशहर, फतेहपूर सिक्री, कानपूर, हाथरस, झाशी, महाराजगंज आणि बागपत या जागा काँग्रेसला सोडण्याची तयारी केली होती; मात्र काँग्रेसला वीस जागा हव्या होत्या.
याआधी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अजय राय यांनी ११ जागांच्या प्रस्तावावर नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर समाजवादी पक्षाने नव्याने जागा निवडून काँग्रेस नेतृत्वाला यादी पाठवली. जागावाटप होण्याआधीच समाजवादी पक्षाने त्यांच्या पक्षाच्या उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. एकीकडे समाजवादी पक्षात अंतर्गत मतभेद वाढत असताना दुसरीकडे काँग्रेसशी जागावाटप होत नसल्याने तिथे पेच निर्माण झाला आहे.