ं
इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
जालना: मराठा समाजास स्वतंत्र नव्हे तर ओबीसीमधून आरक्षण देण्याची मागणी केली आहे. आरक्षण देताना सग्यासोयऱ्यांबाबत निर्णय झाला नाही, त्यामुळे मराठा संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील हे नाराज झाले असून ते आपले आंदोलन अधिक तीव्र करणार आहे. आता उपोषण दरम्यान अन्न आणि पाणी घेणार नाही. बुधवारी १२ वाजता मराठा समाजाची बैठक घेऊन भूमिका जाहीर करु असे त्यांनी आज पत्रकारांशी बोलतांना सांगितले.
विधीमंडळातील विशेष अधिवेशनात मराठा आरक्षण विधेयक सर्व समंतीने मंजूर झाल्यानंतर जरांगे पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, सगेसोयऱ्यांना आरक्षण मिळाले नाही, तर विधिमंडळात मंजूर होणाऱ्या मराठा आरक्षण विधेयकाचा कोणताही फायदा होणार नाही, असे त्यांनी सांगितले. मराठा समाजाने मागणी एक केली आणि सरकार दुसरेच करते आहे, अशी टीका त्यांनी केला.
आज कोट्यवधी मराठ्यांची मागणी ओबीसी प्रवर्गातून आरक्षणाची आहे. ज्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या नाहीत, त्यांच्यासाठी सगेसोयऱ्यांचा कायदा पारित करू, असा शब्द राज्य सरकारने साडेतीन महिन्यांपूर्वी दिला होता, त्याची अंमलबजावणी करा, अशी मागणी त्यांनी केली आहे. सगेसोयऱ्यांच्या विषयावर चर्चा करून त्याची तातडीने अंमलबजावणी करा. अन्यथा, मराठा समाजाचे भयंकर आंदोलन उभे राहील, असा इशारा जरांगे पाटील यांनी दिला आहे.
गेल्या कित्येक दिवसांत राज्य सरकारचे शिष्टमंडळ किंवा प्रतिनिधी आपल्याशी चर्चा करायला आला नसल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. मी माझ्या समाजाचे वाटोळे करू शकत नाही असेही ते म्हणाले.