नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– नाशिक जिल्हा बुद्धिबळ संघटनेकडून येत्या ४ ते ७ मार्च दरम्यान राष्ट्रीय जलद व अतिजलद बुद्धिबळ निवड चाचणी स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. या स्पर्धा नाशिक येथे आयोजित होणार असून आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघा द्वारे प्रमाणित नियमावली नुसार बुद्धिबळाच्या जलद आणि अति जलद स्विस लीग स्वरूपात या स्पर्धा खेळवण्यात येणार आहे आहेत. याआधी २०२२ या वर्षी नाशिक ने सदर स्पर्धेचे यजमानपद भूषविले असून यंदा दुसऱ्यांदा हा मान जिल्ह्यास प्राप्त होत आहे. नाशिक जिल्हा बुद्धिबळ संघटना ही महाराष्ट्र चेस असोसिएशनशी व क्रीडा मंत्रालय, भारत सरकार अंतर्गत येणाऱ्या अखिल बुद्धीबळ महासंघाशी संलग्न आहे. सदर स्पर्धेस महाराष्ट्र चेस असोसिएशन व अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघाची अधिकृत मान्यता तसेच सदर स्पर्धेस संपूर्ण सहकार्य असणार आहे.
दोन वेगवेगळ्या स्वरूपाच्या राष्ट्रीय निवड चाचणी स्पर्धा या निमित्ताने नाशिककरांना पहावयास मिळणार असून या स्पर्धेमधून जागतिक जलद व अतिजलद स्पर्धेसाठी भारतीय चमू ची निवड करण्यात येणार आहे. सदर निवड चाचणी स्पर्धेसाठी २० पेक्षा अधिक राज्यातून ३०० ते ५०० खेळाडू अपेक्षित आहेत. सर्व मानांकित व राज्य भरातून निवड झालेल्या खेळाडूंची राहण्याची संपूर्ण व्यवस्था जिल्हा संघटना मोफत करून देत आहे.
अचूक निर्णयक्षमता, वेगवान व कल्पक डावपेच, डावाच्या पहिल्या भागावरील प्रभुत्व, मानसिक खंबीरता , बुद्धिबळ घडयाळावरील विलक्षण नियंत्रण अशा बौद्धिक क्षमतेचा कस जोखणाऱ्या या स्पर्धेत अनेक नामांकित ग्रँडमास्टर, इंटरनॅशनल मास्टर, महिला ग्रँडमास्टर व इंटरनॅशनल मास्टर, फिडे मास्टर असतील. आंतरराष्ट्रीय मानांकित खेळाडूंचे डावपेच बघण्याची तसेच त्यांच्याबरोबर खेळण्याची संधी नाशिककरांना या निमित्याने मिळणार आहे. वयोगटातील काही राष्ट्रीय विजेते खेळाडूंनी आपला सहभाग निश्चित केले आहेत. अशा दर्जेदार खेळाडूंच्या बुद्धिबळ डावांचा आनंद घेण्यासाठी भारतभरातील तमाम बुद्धिबळ प्रेमी या बुद्धिबळ सोहळ्यानिमित्त्याने स्पर्धेस भेट देतील. अशा स्पर्धांमधून निवड झाल्यास थेट देशाचे प्रतिनिधित्व करता येत असल्याकारणाने या लढतींचे थेट प्रक्षेपण विविध डिजिटल माध्यमांतून केले जाईल.जलद बुद्धीबळ स्पर्धेच्या निकालासाठी ११ सामने खेळण्यात येणार असून ७ मार्च दिवशी अति जलद या बुद्धिबळाच्या प्रकारातील ११ डाव खेळवण्यात येणार आहेत. नाशिक जिल्हा बुद्धिबळ संघटनेमार्फत आयोजित करण्यात येणाऱ्या या स्पर्धेत एकूण ६ लाख ५० हजार रुपयांची रोख पारितोषिके वितरीत करण्यात येतील.सदर स्पर्धेसाठी शंकराचार्य संकुल हे ठिकाण संघटनेने निश्चित केले आहे.
नाशिक जिल्हा बुद्धिबळ संघटना सातत्याने खेळाडूंना जास्तीत जास्त चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी कार्यरत राहिली आहे. मागील ४ वर्षांत संघटनेने ५० पेक्षा जास्त ऑनलाईन तसेच ऑफलाईन स्पर्धा घेतल्या आहेत. अनेक मोफत बुद्धिबळ स्पर्धा, जिल्हास्तरीय निवड चाचण्या, खुल्या व वयोगटातील विविध स्पर्धा यांसारख्या आयोजनातून नाशिक च्या तळागाळापर्यंत बुद्धिबळ प्रचार व प्रसाराचे काम संघटना निस्वार्थी भावनेने करत आहे. जागतिक बुद्धिबळ महासंघाचे माजी उपाध्यक्ष नायजेल शॉर्ट व मेजर ध्यानचंद जीवन गौरव प्राप्त खेळाडू ग्रँडमास्टर अभिजित कुंटे, अर्जुन पुरस्कार प्राप्त व ज्येष्ठ बुद्धिबळ मार्गदर्शक ग्रँडमास्टर प्रवीण ठिपसे यांनी नाशिक जिल्हा बुद्धिबळ संघटनेला भेट देऊन संघटनेच्या कार्याचे कौतुक केले आहे. सन २०१९ मध्ये संघटनेने दृष्टीबाधित व्यक्तींसाठीची पश्चिम विभागीय आंतरराष्ट्रीय मानांकन बुद्धिबळ स्पर्धा यशस्वीपणे आयोजित केली होती याची नोंद राष्ट्रीय स्तरावर घेण्यात आली. एप्रिल २०२२ मध्ये राष्ट्रीय जलद व अति जलद बुद्धिबळ निवड स्पर्धेचे आयोजनही संघटनेने केले होते. १३ वर्षांखालील खेळाडूंसाठी राज्यस्तरीय निवड चाचणी स्पर्धेचे नाशिक मध्ये आयोजन करून नाशिककरांना आपले कौशल्य राज्य व राष्ट्रीय स्तरावर दाखवण्याची संधी संघटना वेळोवेळी उपलब्ध करून देत आहे.
सदर राष्ट्रीय स्पर्धेत १०वी व १२वी ला सहभागाचे ,१५ गुण वर विजेता असल्यास २० गुण प्राप्त होतात तसेच पुढील वाटचालीत नक्कीच हि राष्ट्रीय स्पर्धा मोठी भूमिका बजावेल म्हणुन नाशिककरांनी स्पर्धेत जास्तीत जास्त सहभाग नोंदवावा असे आवाहन संघटनेचे अध्यक्ष श्री.विनय बेळे व सचिव श्री.सुनील शर्मा यांनी केले आहे.
स्पर्धेतील प्रवेश नोंदणी प्रक्रिया ऑनलाइन स्वरूपाची असून , इच्छुक खेळाडू आखिल भारतीय बुद्धिबळ महासंघाच्या वेबसाईट वर सहभाग नोंदवू शकतात.सर्व महाराष्ट्रातील स्पर्धकांना सहभाग नोंदवण्यासाठी महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेची पूर्व परवानगी ईमेल द्वारे घेणे आवश्यक आहे.
राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धा आयोजित करणे हे मोठ्या प्रतिष्ठेचे काम असून अनेक कागदपत्रांची पूर्तता करणे, तांत्रिक बाबी हाताळणे, नियोजित स्पर्धा ठिकाण व निवासाची सोय पाहणे, या सारख्या असंख्य बाबींची पूर्वकल्पना ठेवत स्पर्धा आयोजनाचे शिव धनुष्य पेलावे लागते. स्पर्धेसाठी निधी उभरण्याकरिता अनेक हात उत्स्फूर्तपणे पुढे येत असून स्पर्धेचे प्रमुख प्रायोजकत्व नाशिकचे विख्यात दीपक बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांनी स्वीकारली आहे. सह प्रायोजक म्हणून सागर स्विटस यांनी हातभार लावला आहे. नाशिक मधील प्रतिष्ठित कंपनी नोवेल फायनान्स, इंडिया इन्फोलिन लिमिटेड, एक्स्पलोर इंवेस्टमेंट्स, डिझाईन स्टोरी , रेवोल्ट, बाघ बिल्डर्स अँड डेव्हलपर्स आणि बॉटविनिक चेस स्कूल यांनी देखील पुढाकार घेत संस्थेसाठी मदत उभी केली आहे.
ख्यातनाम आंतरराष्ट्रीय पंच श्री.अनंतराम यांनी या स्पर्धसाठी प्रमुख पंचाची जबाबदारी स्वीकारली असून स्पर्धेची काठिण्य पातळी लक्षात घेता अनेक आंतरराष्ट्रीय पंचाना या स्पर्धेसाठी नियुक्त करण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी श्री.मंगेश गंभीरे : ९३५६८८०३१८ डॉ.सचिन व्यवहारे : ९५११७१३२४३ क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा संघटनेने केले आहे.
सदर स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी महाराष्ट्र बुद्धिबळ संघटना, नाशिक जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे पदाधिकारी, बुद्धिबळ खेळाडू आणि पालक आदी विशेष परिश्रम घेत आहेत.अनेक बुद्धिबळ प्रेमी यांच्या सहकार्यातून सदर स्पर्धेचे नियोजन चालू असून भारतभरातून संस्थेच्या या गगन भरारीला प्रोत्साहन व शाबासकीची थाप मिळत आहे.