इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मुंबईः विशेष अधिवेशनात मराठा आरक्षणासाठी कायदा मंजूर झाल्यानंतर या कायद्याला न्यायालयात आव्हान देण्यात येणार असल्याचा इशारा ॲड. गुणरत्न सदावर्ते यांनी दिला आहे.
मराठा समाजाला मागास ठरवण्याचा घाट घालण्यात आला आहे. कायदा तयार करण्याची संहिता दूर ठेवून मराठा आरक्षणाच्या नावाखाली घाणेरडे राजकारण सुरू झाले आहे. पन्नास टक्के खुल्या प्रवर्गासाठी ठेवलेल्या जागेतून आरक्षण देण्यात आले आहे. इतरांना फक्त ३७ टक्के जागा उरणार आहे. खुल्या प्रवर्गातील लोक मतदार आहेत, याचा मुख्यमंत्र्यांनी विचार करावा, असा इशारा त्यांनी दिला आहे. ओबीसींच्या बाबतीत कुणबीकरण केले जाऊ शकत नाही, सगेसोयरे कायदा करता येणार नाही, असे सदावर्ते म्हणाले.
कोणीतरी जरांगे उपोषणाचे ढोंग करते आहे. ट्रॅक्टर, घर असून ती माहिती दडवली. ‘सोशल मीडिया’वर त्याबाबत प्रचार करण्यात आला. अंगठेबहाद्दर माणसांकडून सर्वेक्षण करण्यात आले, असा आरोप त्यांनी केला. जरांगे यांनी मराठा बांधवांना बुमरँग केले. त्यांच्या हिशोबाने कायदा करणे चुकीचे आहे. तो जरांगे कायदा नाही, अशी टीका ॲड. सदावर्ते यांनी केली. सरकारने कायदा केला तर परिणाम भोगायला तयार राहा, असा इशारा ॲड. त्यांनी दिला.