इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नवी दिल्लीः राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाच्या ताब्यात पक्ष आणि चिन्ह सोपवण्याच्या निर्णयाविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाने दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी झाली. त्यात शरद पवार गटाने चिन्ह मागितल्यानंतर त्यांना एक आठवड्यात चिन्ह द्यावे असे निर्देश न्यायालयाने दिले. यावेळी त्यांनी अजित पवार गटाला दोन आठवड्यात उत्तर देण्याचे निर्देश दिले.
शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले की, पक्ष चिन्हासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे अर्ज करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयानं राष्ट्रवादी काँग्रेस – शरदचंद्र पवार पक्षाला आज दिले. या अर्जानंतर आठवडाभरात निवडणूक आयोगानं त्यांना पक्ष चिन्ह द्यावं, असंही सर्वोच्च न्यायालयानं सांगितले आहे. शरद पवार आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखालच्या पक्षांना त्यांचं त्यांचं पक्ष नाव वापरण्याची मुभा न्यायालयानं दिली. शरद पवार यांच्या पक्षाला कुठलंही पक्ष चिन्ह द्यायला अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं न्यायालयात विरोध केला होता.
निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात पक्षाचे संस्थापक शरद पवार यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यावर न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती दीपंकर दत्ता आणि न्यायमूर्ती केव्ही विश्वनाथन यांच्या खंडपीठासमोर सोमवारी झाली.
निवडणूक आयोगाने अजित पवार यांच्या गटाला पक्षाचे नाव आणि निवडणूक चिन्ह देण्याचा निर्णय सहा तारखेला दिला होता.निवडणूक आयोगाने शरद पवार यांच्या गटाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार असे नाव दिले. त्यावर ‘ज्याने पक्ष स्थापन केला, त्याच्या हातून पक्ष हिसकावून दुसऱ्याच्या हातात दिला असे यापूर्वी कधीच घडले नव्हते, ’अशी टीका शरद पवार यांनी केली होता. महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शरद पवार गटाच्या सर्व याचिका फेटाळून लावत दोन्ही गटाच्या आमदारांना पात्र ठरवले. गेल्या वर्षी जुलैमध्ये अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड करून भाजप सरकारच्या आघाडीत सामील झाले. शरद पवार गटाने पक्षांतरविरोधी कायद्यानुसार आमदारांना अपात्र ठरवण्याची मागणी विधानसभा अध्यक्षांकडे केली होती. याचिका त्यांनी निकाली काढल्या.
निकालानंतर शरद पवार यांनी दिली ही प्रतिक्रिया
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या शुभदिनी दिवशी, भारताच्या निवडणूक आयोगाच्या आदेशाविरुद्ध माननीय सर्वोच्च न्यायालयाने आम्हाला अंतरिम दिलासा दिला आहे. हा मतदारांचा विजय आहे, कारण माननीय सर्वोच्च न्यायालयाने देशातील मतदारांना कमी लेखू नये असे निरीक्षण नोंदवले आणि मूळ पक्षाच्या तिकिटावर उमेदवार लढले त्याचे काय!, असा प्रश्न देखील उपस्थित केला. आम्हाला पूर्णपणे मान्यता देऊ नये या मागणीवर जोरदार टीका करण्याव्यतिरिक्त, अशाच वादामुळे अंतिम मुद्यावरील संबंधित परिस्थितीचा उल्लेख केला आहे.
मध्यंतरी आम्हाला ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार’ म्हणून मान्यता दिल्याबद्दल आणि माननीय ECI ला आमच्या चिन्हासाठी आमच्या अर्जावर ७ दिवसांच्या आत विचार करण्याचे निर्देश दिल्याबद्दल आम्ही माननीय सर्वोच्च न्यायालयाचे आभार मानतो. लोकशाहीचा हा मोठा विजय आहे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केलेल्या संविधानासाठी आम्ही लढत राहू. सत्यमेव जयते!