इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मुंबई : अभिनेता रितेश देशमुख याने ‘वेड’ या मराठी चित्रपटातून दिग्दर्शन क्षेत्रात पाऊल टाकले. ‘वेड’च्या यशानंतर रितेश पुन्हा एकदा दिग्दर्शक म्हणून काम करणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आयुष्यावर आधारित ‘राजा शिवाजी’ या चित्रपटाचे तो दिग्दर्शन करणार आहे.
त्याने एक पोस्ट लिहिली आहे. छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या दिवशी त्याने लिहिलेल्या या पोस्टमधून त्याने दिग्दर्शन करावयाच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या व्यक्तिरेखेचे वर्णन केले आहे. तो म्हणतो, ‘इतिहासाच्या गर्भात, एक अशी आकृती जन्माला आली, जिचं अस्तित्व नश्वरतेच्याही पल्याड होते. एक प्रतिमा, एक आख्यायिका, जी धगधगत्या प्रेरणेचं चिरंतन अग्नीकुंड होतं. छत्रपती शिवाजी महाराज.. फक्त इतिहासपुरुष नाहीत. ती एक भावना आहे.. प्रत्येकाच्या मनामनात उगवणारा आशेचा एक महासूर्य आहे. शिवरायांची महागाथा भव्य पडद्यावर जिवंत करता, यावी दुर्दम्य महत्वाकांक्षा होती.’
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आयुष्यावर आधारित या चित्रपटाचे केवळ दिग्दर्शन करून न थांबता तो मुख्य भूमिका साकारणार आहे. लवकरच या चित्रपटाची शूटिंग सुरू होणार आहे. हा चित्रपट मराठी आणि हिंदीत येणार आहे. निर्मिती मुंबई फिल्म कंपनीसोबत जियो स्टुडिओ करणार आहे. रितेशने या खास चित्रपटासाठी सिनेमॅटोग्राफर म्हणून राष्ट्रीय पुरस्कार विजेते संतोष सिवन यांना निवडले असून, ते मराठी चित्रपटसृष्टीत प्रथमच पदार्पण करणार आहेत.