इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
इंफाळः नागालँड विधानसभेचे अध्यक्ष शेरिंगेन लोंगकुमे यांनी शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील गटाची याचिका फेटाळून लावली आहे. नागालँडमधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सात आमदारांना अपात्र ठरवण्याची मागणी त्यांनी या याचिकेत केली होती.
राष्ट्रीय महासचिव हेमंत टकले यांनी आमदार पिक्टो शोहे, पी. लॉन्गॉन, नम्री नचांग, वाय. म्होनबेमो हमत्सो, तोइहो येप्थो, वाय मानखाओ कोन्याक आणि ए पोंगशी फोम यांच्याविरोधात ३० ऑगस्ट रोजी अपात्रतेची याचिका दाखल केली होती. ही याचिका विधानसभेच्या अध्यक्षांनी फेटाळली आहे. निवडणूक आयोगाने अजित पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह सोपवल्याच्या निर्णयाच्या आधारे नागालँड विधानसभेचे अध्यक्ष शेरिंगेन लोंगकुमे यांनी हा निर्णय घेतला.
या सात आमदारांनी अजित पवार यांना पाठिंबा देणारे पत्र दिले होते. नागालँडमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या सात आमदारांच्या अपात्रतेच्या याचिकेवर निवडणूक आयोग अंतिम निर्णय घेईपर्यंत कोणताही निर्णय घेऊ नये, अशी विनंती अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसने सभापतींना केली होती.
लोंगकुमेर यांनी दहाव्या अनुसूचिचा हवाला देऊन सात आमदारांना अपात्र ठरवता येणार नाही, असा निकाल देताना शरद पवार गटाची याचिका फेटाळली.