इंडिया दर्पण ऑलनाईन डेस्क
श्रीनगरः जम्मू-काश्मीरमध्ये ‘इंडिया’ आघाडीला आणखी एक धक्का बसला आहे. ‘नॅशनल कॉन्फरन्स’(एनसी)पाठोपाठ आता ‘पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी’ने लोकसभा निवडणुकीत स्वतंत्र उमेदवार उभे करण्याचा निर्णय घेतला आहे. पक्षाची संसदीय समिती लवकरच उमेदवारांची नावे जाहीर करणार आहे. यापूर्वी ‘एनसी’ने निवडणूक स्वबळावर लढवण्याची घोषणा केली होती.
‘पीडीपी’च्या लोकसभा निवडणुकीच्या तयारीसंदर्भात मध्य काश्मीरमध्ये झालेल्या बैठकीनंतर पक्षाच्या प्रमुख मेहबूबा मुफ्ती म्हणाल्या, की त्यांचा पक्ष देशातील आगामी लोकसभा निवडणुकीसाठी पूर्णपणे तयार आहे. लवकरच राज्यातील लोकसभेच्या उमेदवारांची नावे निश्चित केली जातील. मोहम्मद सरताज मदनी यांच्या नेतृत्वाखालील पक्षाचे संसदीय मंडळ लवकरच उमेदवार निश्चित करेल. पक्षाचे वरिष्ठ उपाध्यक्ष अब्दुल रहमान वीरी, सरचिटणीस डॉ. मेहबूब बेग आणि गुलाम नबी लोन हंजुरा, अतिरिक्त सरचिटणीस आशिया नकाश, माजी मंत्री नईम अख्तर, जहूर अहमद मीर यांच्यासह जिल्हाध्यक्ष, मतदारसंघ प्रभारी आणि प्रदेशाध्यक्ष उपस्थित होते.
‘एनसी’चे उपाध्यक्ष ओमर अब्दुल्ला यांनी ‘एनसी’च्या ताब्यात असलेल्या जागा वगळता इतर जागांवर युती करण्याचा विचार केला जाईल, असे सांगितले होते. यानंतर काँग्रेस अध्यक्षांनी एकट्याने निवडणूक लढवण्याची घोषणा केली होती. तेव्हा ‘पीडीपी’ने म्हटले होते, की पक्षाचा हेतू एकजुटीचा आहे; परंतु ‘एनसी’चा निर्णय लक्षात घेऊन योग्य वेळी निर्णय घेतला जाईल.