मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्यातील राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा मनसे – भाजप युतीची चर्चेला उधाण आले आहे. लोकसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. या दोघांमध्ये सुमारे एक तास चर्चा झाली. त्यामुळे भाजप आणि मनसे यांच्यातील युतीची चर्चा पुन्हा सुरु झाली आहे.
लोकसभा निवडणुका लवकरच होणार आहेत. या निवडणुकीत भाजप आणि मनसे यांची युती व्हावी यासाठी जोरदार हालचाली सुरु झाल्या आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आतापर्यंत भाजप विरोधात प्रखर विरोधाची भूमिका कधीच घेतली नाही. त्यामुळे या दोन्ही पक्षाची युतीची चर्चा होती. पण, त्याचा मुहूर्त काही मिळत नव्हता. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणवीस यांनी नुकत्याच एका कार्यक्रमात मनसे युतीचे संकेत दिले होते. त्यानंतर आज आशिष शेलार यांची ही भेट झाली आहे.
शेलार यांच्या भेटीअगोदर मनसे नेत्यांची सागर बंगल्यावर एक बैठक झालेली होती. त्यात नेमकं काय झालं हे समोर आले नाही. त्यानंतर आता ही भेट झाल्यामुळे युतीची चर्चा सुरु झाली आहे. मुंबईत मनसेची मराठी व्होटबँक आहे. उध्दव ठाकरे यांना रोखण्यासाठी मनसेचा फायदा होणार आहे. त्यामुळे ही युती केली जाणार असल्याचे बोलले जात आहे. राज ठाकरे यांना दिल्लीतून बोलावणं आल्याचेही बोलले जात आहे. मनसेची युती झाल्यास महायुतीतच मनसे हा चौथा पक्ष असणार आहे.