इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
चंदीगडः महापौर निवडणुकीवरून ‘आम आदमी पक्षा’ने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी असतांनाच महापौर मनोज सोनकर यांनी राजीनामा दिला. तर दुसरीकडे ‘आप’च्या तीन नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला. देशभर लक्षवेधी ठरलेल्या या महापौरच्या निवडणुकीत झालेले उलटफेर मात्र आता चर्चेचा विषय ठरले आहे.
आपचे नगरसेवक पूनम देवी, नेहा मुसावट, गुरचरण काला हे भाजपच्या संपर्कात होते. त्यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांच्या या प्रवेशामुळे भाजप १४ अधिक तीन असे १७ नगरसेवक झाले असून भाजप आता महापौराची निवडणूक संख्याबळावर सहज जिंकू शकेल.
शुक्रवारी रात्रीपासून आम आदमी पक्षाच्या दोन महिला नगरसेवक आणि अन्य एक जण शहराबाहेर होत्या. शनिवारी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी त्यांच्याशी संवाद साधला. एका नगरसेवकाने लग्नाला जाण्याचे कारण पुढे केले, तर दुसऱ्या नगरसेवकाने आपण पक्षात आनंदी नसल्याचे स्पष्टपणे सांगितले होते. रविवारी त्यांचे फोन बंद असल्याचे आढळून आले. त्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याची माहिती पुढे आली.
चंदीगडमध्ये महौपाराच्या निवडणुकीच्या वेळी झालेल्या मतदानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर ही निवडणूक देशभर चर्चेची ठरली होती. पण, आता या राजकीय घडामोडींमुळे या निवडणुकीची पुन्हा चर्चा रंगली आहे.