इंडिया दर्पण ऑनलाई डेस्क
पुणे : वन्य प्राण्यांच्या अधिवासावर दिवसेंदिवस आक्रमण होत असल्याने बिबट्यासारखे वन्य प्राणी तथा जनावरे हे मानवी वस्त्यांमध्ये येऊ लागले आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये पुणे, नगर, नाशिक यासारख्या जिल्ह्यांमध्ये बिबट्याचा मानवी वस्त्यांमध्ये वावर वाढला आहे. इतकेच नव्हे तर हे बिबटे, कुत्रे, डुकरे ,शेळ्या, मेंढ्या या सह अन्य जनावर हल्ला करून त्यांना आपले भक्ष्य बनवितात, यापेक्षा आणखी भयानक गोष्ट म्हणजे गेल्या काही दिवसात बिबट्यांचे महिला पुरुष लहान बालके यांच्यावरही हल्ले वाढल्याचे दिसून येते. त्यातच आता पुणे जिल्ह्यात अशीच एक भयानक घटना घडली आहे. या घटनेमुळे सर्वत्र भीतीचे वातावरण असून वन्य विभागाबद्दल तीव्र संताप व्यक्त होत आहे, कारण एका लहानग्या चिमूरड्याचा बिबट्याने बळी घेतला आहे.
चिमुरड्याच्या जाण्याने मातेने फोडला टाहो
जुन्नर तालुक्यात आळे गावातील तितर मळ्यात अंगणात खेळत असलेल्या चिमुकल्यावर बिबट्याने अचानक हल्ला चढवला. या घटनेत चिमुकल्याचा मृत्यू झाला. कारण शिवांश भुजबळ (वय ४) हा चिमुकला अंगणात खेळत असताना ऊसाच्या शेतात दबा धरुन बसलेल्या बिबट्याने त्याच्यावर अचानक हल्ला केला. बिबट्या शिवांशची मान पकडून त्याला नेऊ लागला. आरडाओरड झाली असता, एका तरुणाने मोठ्या हिंमतीने बिबट्याचा पाठलाग केला. त्याने शिवांशला बिबट्याच्या जबड्यातून सोडवून आणले.
शिवांगचा मृत्यू अन मातेचा आत्महत्येचा प्रयत्न
तरुणाने त्यानंतर जखमी अवस्थेत असलेल्या शिवांशला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात नेले. मात्र, उपचार सुरू असताना शिवांशचा मृत्यू झाला. आपल्या पोटच्या गोळ्याचा बिबट्याने बळी घेतल्याने मातेनेही आत्महत्येचा प्रयत्न केला, माझा चिमुरडा गेला आता जगून मी काय करू , असा टाहो तिने फोडला. तसेच आत्महत्या करण्याचा प्रयत्न शिल्पा भुजबळ या मातेने केला. या घटनेमुळे परिसरातून मोठी हळहळ व्यक्त होत आहे.
ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट
दरम्यान, शिवांशच्या मृत्युनंतर आळे गावातील ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली. वनविभागाने या बिबट्याचा तातडीने बंदोबस्त करावा अन्यथा आंदोलन करू, असा इशारा ग्रामस्थांनी दिला. आता याबाबत वन विभाग काय कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.