नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – केंद्रशासनाच्या नविन व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाच्या अंतर्गत प्रधानमंत्री सूर्यघर योजनेच्या माध्यमातून घरगुती सौर पॅनल बसवून सौर ऊर्जेपासून वीजनिर्मितीला प्राधान्याने गती देत छतावरील (रूफटॉप) सौर ऊर्जेपासून वीज निर्मिती करून थेट ग्रीडला जोडण्यात येणार आहे.
या योजनेअंतर्गत नाशिक मंडळ अंतर्गत असलेल्या नाशिक शहर १ व २, नाशिक ग्रामीण व चांदवड विभागातील लाभ घेण्यास इच्छुक असलेल्या घरगुती वर्गवारीतील वीज ग्राहकांचा मेळावा आयोजीत करण्यात आला आहे. यामध्ये सदर योजनेसंदर्भांतील सविस्तर माहिती, अडचणी, तक्रारी व शंकांचे निरसन करून योजनेचा लाभ देण्यासाठी २० फेब्रुवारी २०२४ रोजी दुपारी ०३.०० वाजता महापारेषण प्रशासकीय कार्यालय येथील ऑडिटोरियम हॉल येथे दुर्गा माता मंदिर शेजारी, सिद्धेश्वर नगर, सैलानी बाबा स्टॉप जवळ, जेल रोड, नाशिक येथे आयोजित केला असून याचा लाभ घेण्याचे आवाहन महावितरणच्या नाशिक मंडळाने केले आहे.
मा. पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी देशभरातील १ कोटी घरांवर रुफटॉप सोलर प्रणाली बसविण्यासाठी प्रधानमंत्री सूर्योदय योजना सुरु केली आहे. या योजनेअंतर्गत घराच्या छतावर सौर पँनल बसवून वीज निर्मिती केली जाणार आहे. यामध्ये अनुदान सुद्धा मिळणार आहे. यामुळे सदर ग्राहकाचे विजेचे बील कमी होणार आहे आणि गरजेपेक्षा जास्त वीज निर्मिती झाल्यास ती वीज कंपनीला विकून उत्पन्नही मिळणार आहे. वीज ग्राहकांना या योजनेचा लाभ घेता यावा यासाठी सदर संवाद मेळावा आयोजित केला आहे.
सदर मेळाव्यात शासकीय नोंदणीकृत सौर कंत्राटदार तथा महावितरणचे वरिष्ठ अभियंते व अधिकारी उपस्थित असतील, तरी इच्छुक ग्राहकांना विनंती आहे की, त्यांनी या संधीचा लाभ घ्यावा आणि या मेळाव्यास उपस्थित राहावे असे आवाहन नाशिक मंडळाचे अधिक्षक अभियंता ज्ञानदेव पडळकर यांनी केले आहे.