मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांनी दिगंबर जैन संप्रदायाचे संत आचार्य श्री विद्यासागर जी महाराज यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे.
आचार्य विद्यासागर जी महाराज यांचे जीवन ज्ञानसाधना, कठोर तपस्या व आत्मकल्याणासाठी समर्पित होते. संस्कृत व प्राकृत भाषांचे गाढे अभ्यासक असलेल्या विद्यासागर जी महाराजांनी प्रवचने, लिखाण तसेच काव्याच्या माध्यमातून आयुष्यभर जनसामान्यांचे प्रबोधन केले व त्यांना आत्मोन्नतीचा मार्ग दाखवला.
त्यांच्या समाधीमुळे एक महान राष्ट्रसंत व समाजसुधारक आपल्यातून निघून गेला आहे. परंतु, त्यांचे विचार धन शाश्वत असून लोकांना उन्नत जीवन जगण्यासाठी नेहमीच मार्गदर्शक सिद्ध ठरेल. त्यांच्या स्मृतींना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो, असे राज्यपाल श्री. बैस यांनी आपल्या शोक संदेशात म्हटले आहे.