नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवक) – आद्य क्रांतिकारक स्व.राघोजी भांगरे यांनी देशासाठी बलिदान केलेले असून देशवासियांच्या सतत स्मरणात राहिल असेच त्यांचे कार्य आहे.इगतपुरी तालुक्यातील सोनोशी या त्यांच्या जन्मगावी भव्य – दिव्य असेच स्मारक व्हावे यासाठी परिपूर्ण असा फेरप्रस्ताव सादर करण्याचे आदेश आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. खासदार गोडसे यांच्या सततच्या पाठपुराव्यातून प्रशासनाने स्मारकाचा प्रस्ताव तयार केलेला असल्याने बैठकीच्या सुरुवातीस मुख्यमंत्री शिंदे यांनी स्मारका विषयीची माहिती घेण्यासाठी विकास कामांसाठी दिल्लीत गेलेल्या खा.गोडसे यांच्याशी थेट मोबाईलवरून संपर्क साधला. सविस्तर प्रस्ताव फेरसादर करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिल्याने आता लवकरच स्मारक उभारणीचा मार्ग मोकळा होणार असल्याची माहिती खा.गोडसे यांनी दिली आहे.
स्व.राघोजी भांगरे यांचे सोनोशी येथे भव्य स्मारक व्हावे यासाठी इगतपुरी तालुक्यातील अनेक आदिवासी बांधवाच्या संघटनांकडून वर्षभरापासून खा.गोडसे, आमदार माणिकराव कोकाटे यांच्याकडे आग्रही मागणी होत होती.आदिवासी बांधवांची मागणी योग्य असल्याने स्मारकासाठी खा. गोडसे यांनी शासनाकडे प्रयत्न सुरू केले होते.गोडसे यांच्या पाठपुराव्याची दखल घेऊन शासनाने स्मारक उभारणीसाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठित केली होती.आदिवासी बांधवांच्या स्मारका विषयीच्या सूचना विचारत घेवून जिल्हा प्रशासनाने तीस कोटी रुपयांचा प्रस्ताव सहा महिन्यांपूर्वी राज्याच्या ग्रामविकास विभागाकडे सादर केला होता. याकामी आमदार कोकाटे यांचाही पाठपुरावा होता. याबरोबरच वासळी येथेही स्व.भांगरे यांचे स्मारक व्हावे यासाठी आ. कोकाटे प्रयत्नशिल आहेत.ग्रामविकास विभागाने सदरचा प्रस्ताव टेक्निकल सॅग्शनसाठी मंत्रालयात पाठवला होता.या ठिकाणी तीस कोटी ऐवजी तेरा कोटीचा खर्च ग्राहय ठरविण्यात आला.
स्वर्गिय राघोजी भांगरे यांच्या स्मारक उभारणीच्या प्रस्तावास प्रशासकीय मान्यता देण्यासाठी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथी गृहावर बैठक आयोजित करण्यात आली होती.बैठकीच्या सुरुवातीस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कामानिमित्त दिल्लीत गेलेल्या खासदार हेमंत गोडसे यांच्याशी मोबाईल वरून संवाद साधला.यावेळी खासदार गोडसे यांनी राघोजी भांगरे यांचे स्मारक म्हणजे तमाम आदिवासी बांधवांची अस्मिता असून सोनोशी येथे भांगरे यांचे स्मारक होणे अत्यंत गरजेचे असल्याचे मुख्यमंत्री महोदयांना सांगितले.स्मारकासाठीचा एकूण प्रस्ताव तीस कोटीचा होता.मात्र टेक्नीकल सॅग्शन स्तरावर प्रस्तावाची रक्कम अवघ्या तेरा कोटीवर आल्याचे उपस्थित अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्याच्या निदर्शनास आणून दिले.
काही जमिन शासनाच्या ताब्यात असून काही जमिन भूसंपादित करण्याची गरज असल्याचे व्हिसीद्वारे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट्र केले. सादर प्रस्तावातील रक्कम आणि टेक्नीकल सायंगशन झालेली रक्कम यात मोठी तफावत आहे.स्वर्गिय भांगरे यांचे स्मारक भव्य,दिव्यच होणे गरजेचे असल्याने फेरप्रस्ताव तातडीने सादर करण्याचे आदेश आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हा प्रशासनाला दिले.यावेळी मुख्यमंत्री कार्यालयाचे अप्पर मुख्य सचिव भूषण गगराणी, प्रधान सचिव खारगे, ग्रामविकास विभागाचे सेक्रेटरी एकनाथ डवले,वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन करीर, नियोजन विभागाचे प्रधान सचिव विजय सौरभ आदी अधिकारी उपस्थित होते.