इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
ऑचंदीगडः चंदीगडची महापौर निवडणूक देशभर चर्चेचा विषय ठरलेली असतांना आता पुन्हा येथील राजकारणात नवा ट्विस्ट आला आहे. चंदीगडची निवडणुकीतील गोंधळ व्हिडिओमुळे चांगलाच चर्चेत आला होता. या व्हिडिओचा आधार घेत आपने निवडणुकीनंतर सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. त्याचा निकाल अद्याप येणे बाकी असतांना आता आपचे तीन नगरसेवक भाजपच्या संपर्कात आल्याची चर्चा सुरु झाली आहे.
या तीन नगसेवकांमध्ये एक पुरुष आणि दोन महिला नगरसेवक भाजपच्या संपर्कात असल्याचे बोलेल जात आहे. येत्या काही दिवसांत ही तिन्ही नगरसेवक पक्षात प्रवेश करू शकतात. गुरुग्राममध्ये लवकरच होणाऱ्या भाजपच्या कार्यक्रमात हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा होणार आहे. हा प्रवेश झाल्यानंतर भाजपची संख्या १४ ऐवजी १७ होईल व भाजप बहुमतात येईल.
शुक्रवारी रात्रीपासून आम आदमी पक्षाच्या दोन महिला नगरसेवक आणि अन्य एक जण शहराबाहेर आहेत. शनिवारी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी त्यांच्याशी संवाद साधला. एका नगरसेवकाने लग्नाला जाण्याचे कारण पुढे केले, तर दुसऱ्या नगरसेवकाने आपण पक्षात आनंदी नसल्याचे स्पष्टपणे सांगितले आहे. आज त्यांचे फोन बंद असल्याचे आढळून आले. दुसरीकडे ‘आप’चे तिन्ही नगरसेवक भाजपमध्ये गेल्यास भारतीय जनता पक्षाचे नवनिर्वाचित महापौर मनोज सोनकर राजीनामा देऊ शकतात, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.