इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
चेन्नईःतामिळनाडूमध्ये फटाक्यांच्या कारखान्यात झालेल्या स्फोटात दहा जणांना जीव गमवावा लागला आहे. या अपघातात इतर अनेक जण जखमी झाल्याची माहिती आहे. विरुधुनगर जिल्ह्यातील फटाक्यांच्या कारखान्यात शनिवारी झालेल्या स्फोटात किमान दहा जण ठार आणि अनेक जण जखमी झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून मदत जाहीर केली असून प्रत्येक मृताच्या नातेवाईकांना २ लाख रुपये तर जखमींना प्रत्येकी ५० हजार रुपये मदत स्वरुपात दिले जाणार आहेत. तर मृतांच्या कुटुंबीयांना राज्य सरकार प्रत्येकी तीन लाख रुपये देणार आहे.
स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार, स्फोट इतका भीषण होता, की फटाक्यांच्या कारखान्याशिवाय चार इमारती उद्ध्वस्त झाल्या. विजय असे कारखान्याच्या मालकाचे नाव आहे. हा कारखाना शहरातील वेंबकोट्टई परिसरात होता. या घटनेनंतर पोलिस आणि अग्निशमन विभागाचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी जखमींना स्थानिक रुग्णालयात दाखल केले.
रासायनिक मिश्रणामुळे हा स्फोट झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सात जणांचा जागीच मृत्यू झाला, तर तिघांचा रुग्णालयात नेत असताना मृत्यू झाला. कारखान्यातील केमिकल मिक्सिंग रूममध्ये हा अपघात झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. गेल्या वर्षीच्या सुरुवातीला तामिळनाडूतील कृष्णगिरी येथे फटाक्यांच्या कारखान्यात झालेल्या स्फोटात तीन महिलांसह आठ जणांचा मृत्यू झाला होता. या अपघातात इतरही अनेक जण जखमी झाले आहेत.