नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरात घरफोडीचे सत्र सुरुच असून दोन वेगवेगळ्या घटनेत चोरट्यांनी सव्वा लाखाचा ऐवज चोरुन नेला. पहिली घटना अंबड लिंकरोडवरील म्हाडा कॉलनी भागात झाली. या घरफोडीत चोरट्यांनी सुमारे ६५ हजाराच्या ऐवजावर डल्ला मारला. त्यात रोकडसह घरातील एलईडी टिव्ही व गॅस सिलेंडर टाक्यांचा समावेश आहे. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मनोज कैलास अहिरे (रा.तुळजाभवानी मंदिरासमोर,म्हाडा कॉलनी) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. अहिरे कुटूंबिय दि.१३ ते १५ फेब्रुवारी दरम्यान बाहेरगावी गेले असता ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडून कपाटात ठेवलेली रोकड तसेच घरातील टिव्ही आणि गॅस सिलेंटरच्या टाक्या असा सुमारे ६४ हजार ५०० रूपये किमतीचा ऐवज चोरून नेला. अधिक तपास हवालदार चव्हाण करीत आहेत.
तर दुस-या घटनेत अक्सा मज्जीद भागातील किराणा दुकान फोडून चोरट्यांनी सुमारे ६० हजाराचा ऐवज चोरून नेला. त्यात गल्यातील रोकडसह किराणामालाचा समावेश आहे. याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जुनेद अहमद सौदागर (रा.ब्ल्यूमुन सोसा.अक्सा मज्जीद जवळ) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. सौदागर यांचे आपल्या घर परिसरात किराणा दुकान आहे. गुरूवारी (दि.१५) रात्री अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या दुकानाचे मागील बाजूचे शटर उचकटून ही चोरी केली. दुकानात शिरलेल्या चोरट्यांनी गल्यातील रोकडसह किराणा माल असा सुमारे ६० हजार रूपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला असून अधिक तपास हवालदार पगार करीत आहेत.
४० वर्षीय व्यक्तीची आत्महत्या
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – बिटको कॉलेज परिसरातील चव्हाण मळयात राहणा-या ४० वर्षीय व्यक्तीने गळफास लावून घेत आत्महत्या केली. सदर व्यक्तीच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याबाबत उपनगर पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
अनिल बाबुराव साळवे असे मृत इसमाचे नाव आहे. साळवे यांनी शुक्रवारी (दि.१६) सायंकाळच्या सुमारास अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरात अँगलला दोरी बांधून गळफास लावून घेतला होता. ही बाब निदर्शनास भरत कटारे यांनी त्यास बेशुध्द अवस्थेत जिल्हारूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी तपासून मृत घोषीत केले. अधिक तपास जमादार कोकाटे करीत आहेत.