इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
बारामतीः राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ हे चिन्ह हातून गेल्यानंतर शरद पवार आज पहिल्यांदाच बारामतीमध्ये आले आहेत. पक्ष आणि चिन्ह दुसऱ्याला दिले, म्हणून अस्तित्व संपत नाही, अशा शब्दांत त्यांनी कार्यकर्त्यांना धीर दिला. माझ्या वयाची चिंता करू नका आणि चिन्हाची करू नका, असे सांगत त्यांनी कार्यकर्त्यांत उमेद भरली.
राजकारणात काही पक्ष उभे राहतात, काही लोक पक्ष सोडतात. तर काही नवे लोक येतात. चिन्ह काढून घेतल्याने म्हणजे संघटनेचे अस्तित्व संपत नसते, असे सांगत सामान्य लोकांशी संपर्क ठेवण्याचा सल्ला पवार यांनी कार्यकर्त्यांना दिला. मी आत्तापर्यंत १४ निवडणुका लढलो, त्यातल्या पाच निवडणुकांमध्ये चिन्ह वेगवेगळी होती, असे निदर्शनास आणीत चिन्ह बदलल्याची भीती बाळगू नका, असे त्यांनी सांगितले.
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या निकालावर त्यांनी टीका केली. हा निकाल आम्हाला अपेक्षित होता. शिवसेनेसारखाच हा निकाल आहे. ज्याने पक्ष स्थापन केला, त्याचा पक्ष काढून दुसऱ्याला दिला. चिन्हही देऊन टाकले. हा निर्णय कायद्याला धरून नाही. त्यामुळे आम्ही सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली असून त्याचा निकाल नीट लागेल अशी अपेक्षा आहे, असे शरद पवार म्हणाले.