इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मुंबई : विद्यार्थ्यांना शिस्त लागावी म्हणून त्यांना समज देणे वा शिक्षा करणे, असे प्रकार शिक्षक करत असतात. मात्र, सुरतमधील एका शिक्षिकेने विद्यार्थिनीला एक, दोन नव्हे तर तब्बल ३० वेळा मारल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रकाराने शिक्षिका न तू वैरिणी, अशीच भावना व्यक्त करण्यात येत आहे.
शिक्षक हे देवासमान असतात. शिक्षकाला आपल्या संस्कृतीत देवतेसमान दर्जा देण्यात आला आहे. परंतु, बरेचदा शिक्षक मंडळी असे काही कृत्य करतात की त्यांच्याप्रती असलेला आदर ते गमावून बसतात. असाच काहीसा प्रकार सुरत येथे घडला आहे. सूरतमधील एका शाळेतील शिक्षकाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये शिक्षिका एका चार वर्षांच्या मुलीला तीस वेळा मारताना दिसत आहे.
हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर महिलेला अटक करण्यात आली आहे. यानंतर शाळेने कारवाई करत महिलेला निलंबित केले. साधना निकेतन शाळेत ही घटना घडली. वर्गात लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात मुलीला मारहाण झाल्याचे फुटेज कैद झाले आहे. शिक्षिका मुलीच्या शेजारी बसून तिच्या पाठीवर आणि गालावर ३० वेळा मारताना दिसत आहे. जशोदाबेन खोखरिया असे आरोपी महिलेचे नाव आहे. सहायक पोलिस आयुक्त विपुल पटेल यांनी दिलेल्या माहितीनुसार,‘मुलीच्या पालकांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे आरोपी महिलेला अटक करण्यात आली आहे. जशोदाबेन यांना भारतीय दंड संहिताच्या कलम ३२३ आणि बाल न्याय कायदा २०१५ च्या संबंधित कलमांनुसार अटक करण्यात आली.
आम्हाला हवा न्याय
मुलीच्या पालकांनी दिलेल्या माहितीनुसार, जेव्हा त्यांची मुलगी घरी आली तेव्हा तिच्या अंगावर अनेक खुणा होत्या, शाळेतील शिक्षिकेने तिला बेदम मारहाण केल्याचं तिने सांगितलं नाही. मात्र मुलीच्या पालकांनी शाळेत जाऊन मुख्याध्यापकांना वर्गातील सीसीटीव्ही फुटेज दाखवण्यास सांगितले. शिक्षिकेने इतर विद्यार्थ्यांसमोर मुलीला किती निर्दयीपणे मारहाण केली हे फुटेजमध्ये स्पष्टपणे दिसत होते. आम्हाला न्याय हवा, अशी मागणी त्यांनी केली आहे.