नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- सिडकोतील दत्तचौक भागात डीटीएच छत्रीची दुरूस्ती करीत असतांना एकाचा दुस-या मजल्यावरून पडल्याने मृत्यू झाला. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
साहेबराव उत्तम घेरडे (रा. महालक्ष्मी मंगल कार्यालयाजवळ, दत्तचौक) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. शुक्रवारी (दि.१६) रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. घरातील टिव्ही व्यवस्थीत दिसत नसल्याने घेरडे दुस-या मजल्यावर चढले होते. डिश छत्रीची दुरूस्ती करीत असतांना अचानक तोल गेल्याने ते जमिनीवर कोसळले.
या घटनेत डोक्यास गंभीर दुखापत झाल्याने कुटूंबियांनी त्यांना तात्काळ जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी तपासून मृत घोषीत केले. अधिक तपास जमादार शेख करीत आहेत.