नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- हलगर्जीपणामुळे बालकाचा मृत्यू झाल्या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार डॉ.नितीन फरगडे (रा.संजीवनगर,अंबड) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित डॉक्टरचे नाव आहे. याबाबत अखिलेश भिरीगुनाथ शर्मा (रा.जाधव संकुल,अंबड सातपूर लिंकरोड) यांनी फिर्याद दाखल केली आहे. शर्मा यांच्या अमन अखिलेश शर्मा या दहा वर्षीय मुलास १३ सप्टेंबर २०१९ मध्ये ताप आला होता. त्यामुळे त्यांनी त्यास तातडीने नजीकच्या खासगी रूग्णालयात दाखल केले होते.
ताप आलेला असतांना आजाराचे योग्य निदान न करता संशयिताने हलगर्जीपणे उपचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यातून मुलाचा मृत्यू झाला असून चौकशी अंती हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास उपनिरीक्षक पाडेकर करीत आहेत.