इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नवी दिल्लीः पंजाब-हरियाणा सीमेवर शेतकऱ्यांच्या आंदोलनादरम्यान शंभू सीमेवर तैनात असलेल्या एका पोलिसाचा मृत्यू झाला आहे. हरियाणा पोलिस उपनिरीक्षक हिरालाल असे या पोलिसाचे नाव आहे.
हिरालाल हे ५२ वर्षांचे होते आणि शेतकऱ्यांचा विरोध लक्षात घेऊन त्यांना शंभू सीमेवर तैनात करण्यात आले होते. शंभू बॉर्डर पंजाबमधील पटियाला येथे आहे. उपनिरीक्षक हिरालाल हरियाणाच्या सीमावर्ती भागात तैनात होते. ड्युटीवर असताना हिरालाल यांची प्रकृती अचानक बिघडली. यानंतर त्यांना तातडीने अंबाला सिव्हील हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. येथील डॉक्टरांनी त्यांचा जीव वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न केला; मात्र त्यांना यश आले नाही. उपचारादरम्यान हिरालाल यांचा मृत्यू झाला. हिरालाल हे प्रदीर्घ काळ हरियाणा पोलिसांची सेवा करत होते. अलीकडेच शेतकऱ्यांच्या ‘दिल्ली मार्च’च्या घोषणेवेळी शंभू सीमेवर तैनात करण्यात आले होते.
शुक्रवारी (१७ फेब्रुवारी) शंभू सीमेवर एका वृद्ध शेतकऱ्याचा मृत्यू झाला. शेतकऱ्याच्या मृत्यूचे कारण हृदयविकाराचा झटका असल्याचे सांगण्यात आले. ते गुरुदासपूरहून आंदोलन करण्यासाठी आले होते. शंभू सीमेवर मित्रांसोबत ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये झोपलेले ७८ वर्षीय ज्ञान सिंह यांनी शुक्रवारी पहाटे छातीत दुखत असल्याची तक्रार केली. यानंतर त्यांना आंदोलनात सहभागी असलेल्या रुग्णवाहिकेतून पंजाबच्या राजपुरा येथील सिव्हील हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. येथून डॉक्टरांनी त्यांना पटियाला येथील राजेंद्र रुग्णालयात हलवले. रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. ज्ञानसिंह यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ‘दिल्ली चलो’ मोर्चात सहभागी होण्यासाठी ते दोन दिवसांपूर्वी शंभू बॉर्डरवर आले होते.