नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- नजर चुकीने ऑनलाईन वर्ग झालेली एक कोटींची रक्कम बँक कर्मचा-यांनी परस्पर वापरल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ओडीसा राज्यातून ही रक्कम वर्ग झाली होती. संस्थेने पाठपुरावा करून रक्कम परत मिळण्यास दिरंगाई होत असल्याने त्यांनी पोलीसात धाव घेतली. त्यानंतर याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात खासगी बँकेच्या दोन कर्मचा-यांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार वरदकुमार रजनिकांत पटेल व श्वासत शहा अशी संशयित बँक कर्मचा-यांची नावे आहेत. याबाबत सुशिल कुमार दुतीया कुजूर (रा.सुंदरगड,ओडिसा) यांनी फिर्याद दिली आहे. सुशिलकुमार कुजूर यांच्या कॉपराईट इन्फोटेक या संस्थेचे एचडीएफसी बँकेत खाते आहे. या खात्यात गेल्या २७ ऑक्टोबर रोजी सुंदरगड (ओडीसा) येथील डिस्ट्रीक सोशल वेल्फेअर ऑफिसरकडून अनावधानाने एक कोटी रूपयांची रक्कम ऑनलाईन वर्ग करण्यात आली.
ही बाब निदर्शनास येताच संस्थेकडून गेल्या तीन महिन्यांपासून पैसे परत मिळण्यासाठी शहरातील थत्तेनगर येथील बॅकेत पाठपुरावा सुरू आहे. मात्र रक्कम अद्याप परत करण्यात आली नाही. कुजूर यांनी नाशिक गाठून चौकशी केली असता बँक कर्मचा-यांनी ही रक्कम आपली नसल्याचे माहित असूनही अन्य बँक खात्यांमध्ये वर्ग करून आर्थिक फायदा करून घेत फसवणुक केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक पवार करीत आहेत.