इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
बारामतीः पवारांचा बालेकिल्ला असणा-या बारामती लोकसभा मतदार संघात आता विद्यमान खा. सुप्रिया सुळे विरुध्द सुनेत्रा पवार अशी लढत होणार असल्याचे जवळपास स्पष्ट झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या विरोधात उपमुख्यमंत्री अजित पवार गट या निवडणुकीत एकमेकांसमोर असणार आहे. गेल्या काही दिवसांपासून सुनेत्रा पवार यांच्या विकासकामाचा रथ बारामती मतदारसंघातून फिरवला जात आहे. अजित पवार यांनी आम्ही दिलेला उमेदवार खासदार करा, अशी असे साकडे घातले आहे.
बारामतीमध्ये खा. सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार यांच्यात चुरशीची लढत होईल, असे दिसते. सुनेत्रा पवार यांनी बारामती लोकसभा मतदारसंघात संपर्क सुरू केला आहे. खा. सुळे यांनीही पायाला भिंगरी बांधून मतदारसंघ पिंजून काढायला सुरुवात केली आहे. बारामतीतील नणंद-भावजयीत होणारी लढत आता राज्यात लक्षवेधी होणार आहे. विशेष म्हणजे या लढतीत निकाल काही लागला तरी खासदार पद हे पवारांच्या घरातच असणार आहे.
तटकरे यांनी सुनेत्रा पवारांनी लोकसभा लढवावी अशी बारामती मतदारसंघातील लोकांची इच्छा असल्याचे वक्तव्य केले आहे. त्यामुळे सुळे विरुद्ध पवार असा सामना रंगणार आहे.