नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरातील वेगवेगळय़ा भागात सापळा लावून गुन्हे शाखेच्या युनिट १ पथकाने दिवसभरात पाच गुन्हेगारांना गजाआड केले.शहर गुरूवारी ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत पिस्तूल बाळगणा-या सराईत गुन्हेगारासह दहशत माजविणारे आणि जबरीचोरी करणा-या दोघांचा समावेश आहे.
फुलेनगर परिसरातील फिल्ट्रेशन प्लॅन्टचे जुन्या पाण्याच्या टाकीखाली गावठी पिस्तूल विक्रीसाठी एक रेकॉर्डवरील गुन्हेगार येणार असल्याची माहिती पथकास मिळाली होती. त्यानुसार गुरूवारी पथकाने सापळा लावला असता सुमित दयानंद महाले (२१ रा.मुंजाबाबा गल्ली फुलेनगर) हा सराईत गुन्हेगार पोलीसांच्या हाती लागला. संशयिताच्या अंगझडतीत देशी बनावटीचा पिस्तोल व दोन काडतुसे असा ३१ हजाराचा ऐवज मिळून आला असून याप्रकरणी हवालदार विशाल काठे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान संशयित सुमित महाले पंचवटी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एका गुह्यात पसार असल्याने त्यास मुद्देमालासह पंचवटी पोलीसांच्या स्वाधिन करण्यात आले आहे.
दुसरी कारवाई पेठफाटा भागात करण्यात आली. पंचवटी पोलीस ठाणे हद्दीत दहशत माजविण्याच्या गुह्यात पसार झालेला प्रेम महाले हा आपल्या साथीदारासह पेठफाटा भागात येणार असल्याच्या माहितीच्या आधारे सापळा लावण्यात आला होता. प्रेम दयानंद महाले (२२) व हेमंत उर्फ सोनू धोंडीराम मोरे (१८ दोघे रा.मुंजाबाबा गल्ली फुलेनगर) हे दोघे तेथे येताच पोलीसांनी त्यांच्या मुसक्या आवळल्या. संशयितांनी गुह्याची कबुली दिल्याने त्यांना पंचवटी पोलीसांच्या स्वाधिन करण्यात आले आहे.
तिसरी कारवाई नाशिकरोड येथील वीर सावरकर उड्डाणपूल भागात करण्यात आली. उड्डाणपूलाखाली दोन इसम चोरीचा मोबाईल विक्री करण्यासाठी येणार असल्याच्या माहितीच्या आधारे पथकाने सापळा लावला असता अजय राजेंद्र गरूड (२५ रा.माळेगाव,सिन्नर) व विक्रम त्र्यंबक लहाने (२३ रा.सोनगीरी जाखोरीरोड,ता.सिन्नर) हे दोघे पोलीसांच्या जाळयात अडकले. चौकशीत त्यांनी मुंबईनाका पोलीस ठाणे हद्दीतून पादचा-यास धमकावित मोबाईल पळविल्याची कबुली दिली असून त्यांच्या ताब्यातून चोरीचा मोबाईल व गुह्यात वापरलेली दुचाकी असा सुमारे १ लाख १५ हजाराचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. संशयितांना मुद्देमालासह मुंबईनाका पोलीसांच्या स्वाधिन करण्यात आले आहे. ही कारवाई निरीक्षक अनिल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक हेमंत तोडकर,उपनिरीक्षक विष्णू उगले,जमादार रविंद्र बागुल,हवालदार प्रविण वाघमारे,प्रदिप म्हसदे,विशाल काठे,संदिप भांड,महेश साळुंके,नाझीमखान पठाण,धनंजय शिंदे,देविदास ठाकरे,पोलीस नाईक विशाल देवरे,मिलींदसिंग परदेशी अंमलदार राहूल पालखेडे,जगेश्वर बोरसे,अमोल कोष्टी,नितीन जगताप,आप्पा पानवळ,मुक्तार शेख आदींच्या पथकाने केली.