अहमदनगर (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंतीचे औचित्य साधत १९ फेब्रुवारी रोजी अहमदनगर भुईकोट किल्ल्यात वारसा फेरी (हेरिटेज वॅाक) आयोजित करण्यात आली आहे.
जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी केलेल्या आवाहनानुसार जिल्ह्यातील विविध किल्ल्यांवर, गडकोटांवर शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून अहमदनगरच्या किल्ल्यात सकाळी ९ वाजता वारसा फेरी आयोजित करण्यात आली आहे.
किल्ल्याच्या प्रवेशद्वारापासून वारसा फेरीला प्रारंभ होईल. किल्ला पहात असताना शिवकाळात नगरमध्ये घडलेल्या घटनांना उजाळा दिला जाईल. यानिमित्ताने घोषवाक्य व प्रश्नमंजूषा स्पर्धाही घेण्यात येणार आहे. सुमारे दोन तास चालणारा हा उपक्रम सर्वांसाठी खुला असून शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थी, नागरिक व इतिहासप्रेमींनी वारसा सहलीत सहभागी व्हावे.