पिंपळगाव बसवंत (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कोण कशी फसवणूक करेल व कसा गंडा घालेल हे सांगता येत नाही. एका व्यापा-याने थेट बँकेचीच फसवणूक केली. ती सुध्दा साडेतीन कोटी रुपयाची. ही फसवणूक कशी करण्यात आली याबाबत चांगलीच चर्चा आता रंगली आहे.
पिंपळगाव येथे अनिकेत मुंदडा या तरुण व्यापा-याने बनावट डिमांड ड्राफ्ट तयार करून अॅक्सिस बँकेच्या शाखेला साडेतीन कोटी रुपयांचा गंडा घातला आहे. ए. के. ट्रेंडीगचा मालक असलेला अनिकेत श्रीनिवास मुंदडा (रा. पिंपळगाव बसवंत) हा घोटाळा करुन फरार झाला आहे.
ए. के. ट्रेडींगच्या माध्यमातून व्यवसाय करणारा अनिकेत मुंदडा व त्याचे साथीदार राजू, मथुराज, व विश्वास यांनी आठ दिवसांपूर्वी बनावट डिमांड ड्राफ्ट तयार केला. पिंपळगावच्या महामार्गावरील अॅक्सिस बँकेत डिमांड ड्रॉफ्टच्या सहाय्याने साडेतीन कोटी रुपये काढून पोबारा केला. मुंदडा व त्यांच्या टोळीने दिलेला त्याच क्रमांकाचा डिमांड ड्रॉफ्ट बंगळुरुच्या शाखेत सादर केला. त्यावेळी हा घोटाळा बँक अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या लक्षात आला. अॅक्सिस बँकेचे शाखा व्यवस्थापक नितीन राजेंद्रनाथ बाली यांनी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मुंदडा व त्याच्या तीन साथीदारांविरोधात पिंपळगाव पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस निरीक्षक दुर्गेश तिवारी यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरु आहे.