इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
राज्यसभेच्या निवडणुकीसाठी राज्यातल्या ६ जागांसाठी दाखल झालेल्या ७ अर्जांपैकी एक अर्ज बाद झाल्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. पुण्यातले सामाजिक कार्यकर्ते विश्वास जगताप यांनी अपक्ष म्हणून भरलेला अर्ज आज पडताळणीअंती बाद ठरल्यामुळे एकुण सहा जागेसाठी आता सहाच उमेदवार रिंगणात राहिले आहे.
या निवडणुकीसाठी भाजपाकडून माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, माजी आमदार मेधा कुलकर्णी आणि डॉ. अजित गोपछडे यांनी अर्ज भरले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रफुल्ल पटेल, काँग्रेसकडून चंद्रकांत हंडोरे आणि शिवसेनेकडून मिलिंद देवरा हे उमेदवार आहेत. या सर्वांचा विजय आता निश्चित झाला आहे.
या निवडणुकीत भाजप चौथा उमेदवार रिंगणात उतरवेल अशी चर्चा होती. पण, भाजपने चौथा उमेदवार दिला नाही. पण, एक अपक्ष अर्ज आल्यामुळे ही निवडणुक रंगणार अशी चर्चा सुरु झाली होती. पण, आता अपक्ष उमेदवाराचा अर्ज अवैध ठरवल्यामुळे या निवडणूकीची बिनविरोध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.