नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जलवाहिन्यांसह विविध विकासकामांसाठी नोव्हेंबरच्या पुरवणी अर्थसंकल्पात तरतूद धरण्यात यावी, मंजूर व प्रस्तावित कामे त्वरित सुरू करावीत, अन्यथा प्रभाग २४ मध्ये ठिकठिकाणी धरणे आंदोलनासह तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष व सत्कार्य फाउंडेशनने दिला आहे. महापालिका आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांना याबाबतचे निवेदन देण्यात आले आहे.
गोविंदनगर, खोडे मळा, पांगरे मळा, कर्मयोगीनगर, तिडकेनगर, कालिका पार्क, मंगलमूर्तीनगर, सद्गुरूनगर, सदाशिवनगर, काशिको पार्क, कृष्णबन कॉलनी यासह प्रभाग २४ मधील ऐंशी टक्के भागात पावसाळी गटारच नाही, यासाठी आर्थिक तरतूद करण्यात यावी, याचा तीन वर्षांपासून पाठपुरावा सुरू आहे. दरवर्षी पावसाळ्यात नागरिकांच्या घरात पाणी जाते. वीस-पंचवीस वर्षे ही सुविधा मिळत नसेल, तर आंदोलनाशिवाय पर्याय नाही. सर्व रस्त्यांवरील खड्डे बुजवून डांबरीकरण करावे, चार वर्षांपासून करार होवूनही विकसित होत नसलेल्या इंडिगो पार्कजवळील जॉगिंग ट्रॅकचे काम त्वरित सुरू करावे. रणभूमी ते बडदेनगर, पाटीलनगर रस्त्याला जोडणार्या अठरा मीटर रस्त्याच्या प्रस्तावाला मंजुरी देवून काम सुरू करावे.
शिवसेना, सत्कार्य फाउंडेशनच्या प्रयत्नांनी ज्या कामांच्या निविदा निघाल्या, ती कामे सुरू करण्याची कार्यवाही करावी. प्रस्तावित आर डी सर्कल – बाजीरावनगर रस्ता अठरा मीटर रूंद करून विकसित करावा आदी मागण्या या निवेदनात करण्यात आल्या आहेत. या मागण्या मान्य न झाल्यास डिसेंबर २०२३ पासून प्रभागात ठिकठिकाणी धरणे, सह्यांची मोहीम, ठिय्या आदींसह तीव्र आंदोलने करून प्रशासनाला जाग आणण्यात येईल, असा इशारा सत्कार्य फाउंडेशनचे अध्यक्ष बाबासाहेब गायकवाड (देशमुख), शिवसेना कार्यकर्त्या चारुशीला गायकवाड (देशमुख), शाखाप्रमुख बाळासाहेब मिंधे, मयुर आहेर, धवल खैरनार, संगिता देशमुख, प्रभाकर खैरनार, रवींद्र सोनजे, विनोद पोळ, निलेश ठाकूर, विठ्ठलराव देवरे, भालचंद्र रत्नपारखी, दिलीप निकम, डॉ. शशीकांत मोरे, बापूराव पाटील, बाळासाहेब देशमुख, अशोक पाटील, उज्ज्वला सोनजे, मीना टकले, वंदना पाटील, भारती देशमुख, मनोज वाणी, अनंत संगमनेरकर, बाळासाहेब राऊतराय, शैलेश महाजन, मगन तलवार, मनोज पाटील, दीपक दुट्टे, सतीश मणिआर, सचिन राणे आदींनी दिला आहे. शहर अभियंता शिवकुमार वंजारी यांनाही हे निवेदन देण्यात आले आहे.