इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
इंफाळः मणिपूरमध्ये पुन्हा एकदा हिंसाचार उसळला. सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत किमान दोन जणांचा मृत्यू झाला असून दोन डझनहून अधिक जखमी झाले आहेत. चिरचंदपूर जिल्ह्यातील एसपी कार्यालयावर अज्ञातांनी हल्ला केला. यानंतर पोलिसांनाही कारवाई करावी लागली.
मिळालेल्या माहितीनुसार, सुमारे ४०० आंदोलकांनी एसपी कार्यालयाला घेराव घातला होता. हे सर्वजण सियामलापोल या एका हेड कॉन्स्टेबलला बहाल करण्याची मागणी करत होते. हे संपूर्ण प्रकरण एका सेल्फीशी संबंधित होते. एका सेल्फीमुळे वाद निर्माण झाला होता. १४ फेब्रुवारी रोजी हेड कॉन्स्टेबलचा एक सेल्फी व्हिडिओ समोर आला होता. त्यात कुकी अतिरेक्यासोबत दिसतो.
यानंतर एसपींनी कारवाई करत हेड कॉन्स्टेबलला निलंबित केले. यानंतर १५ फेब्रुवारी रोजी रात्री उशिरा सुमारे ४०० जणांच्या जमावाने एसपी कार्यालयाला घेराव घातला. हल्लेखोरांनी कार्यालयावर दगडफेक करून आग लावली. आंदोलकांना नियंत्रित करण्यासाठी ‘रॅपिड ॲक्शन फोर्स’ने अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. एक गोळी देखील झाडण्यात आली. यामध्ये किमान दोन जणांचा मृत्यू झाला.