नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गंगापूररोडवर पोलीस असल्याची बतावणी करीत भामट्यांनी वृध्द महिलेचे सोन्याचे दागिणे लांबविल्याची घटना वर्दळीच्या ठिकाणी घडली. या घटनेत सन १९७४ मध्ये खरेदी केलेले सुमारे २ हजार २५० रूपये किमतीचे अलंकार भामट्यांनी पळविले असून याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेमलता सतिष गोगटे (७० रा. निर्मला कॉन्व्हेंट समोर,साई चौक) यांनी फिर्याद दिली आहे. गोगटे या गुरूवारी (दि.१५) कामानिमित्त घराबाहेर पडल्या होत्या. निर्मला कॉन्व्हेंटकडून त्या प्रसाद सर्कलच्या दिशेने पायी जात असतांना रस्त्यावर उभ्या असलेल्या दुचाकीवरील दोघा भामट्यांनी त्यांची वाट अडविली. पोलीस असल्याची बतावणी करीत भामट्यांनी त्यांना अंगावरील अलंकार काढून ठेवण्याचा सल्ला दिला.
गोगटे यांचा विश्वास बसल्याचे लक्षात येताच भामट्यांनी गळयातील मंगळसूत्र आणि हातातील बांगड्या पिशवीत ठेवण्यास मदत करण्याच्या बहाण्याने १९७४ मध्ये २ हजार २५० रूपयात खरेदी केलेले अलंकार लांबविले. भामटे दुचाकीवर पसार झाल्यानंतर गोगटे यांनी पिशवी उघडून दागिण्यांची खात्री केली असता हा प्रकार समोर आला असून अधिक तपास उपनिरीक्षक भिसे करीत आहेत.