इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
जालनाः राज्य मागासवर्ग आयोगाने मराठा आरक्षणाला अनुकूल अहवाल दिला आहे. राज्यातील सगळाच मराठा समाज हा कुणबी असून त्यांच्या आरक्षणाचा कायदा वीस तारखेपर्यंत करावा. अन्यथा, त्यांनतर मग मराठा त्यांचे धोरण राबवतील, असा इशारा मराठा संर्घयोद्धा मनोज जरांगे पाटील यांनी दिला.
सगेसोयऱ्यांची अंमलबजावणी झाल्याशिवाय थांबणार नसल्याचे सांगून ते म्हणाले, की राज्यात आणि केंद्रातही ओबीसी आरक्षण द्या. महाराष्ट्रात सगळेच मराठे कुणबी आहेत. सगळेच शेतकरी आहेत. वीस तारखेपर्यंत सगेसोयऱ्यांच्या अध्यादेशाची अंमलबजावणी करा, राज्यभरात आंदोलकांवर दाखल झालेले गुन्हे मागे घ्या, अशा मागण्या त्यांनी केल्या.
दरम्यान, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना जरांगे पाटील यांनी त्यांना चार दिवस उपोषण करून दाखवण्याचे आव्हान दिले. मराठ्यांच्या लढ्यामुळेच मागासवर्ग आयोगाचा अहवाल आला आहे. स्वतंत्र मराठा आरक्षणामुळे ५० टक्केच्यावर मर्यादा ओलडणार आहे. सगेसोयऱ्याच्या अंमलबजावणीवर आम्ही ठाम आहोत. मराठ्यांना फसवले तर पुन्हा लढाई उभारू, असा इशारा त्यांनी दिला. राणे यांनी आमच्यावर पाच वेळा टीका केली. ते मोठे नेते आहेत. यापुढे ऐकून घेणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.