इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नंदुरबार : तोरणमाळ येथील घाटातून जाताना वाहन चालकाचे नियंत्रण सुटून वाहन खोल दरीत कोसळल्याने चार जण जागीच ठार झाले, तर दोन जण गंभीर जखमी आहेत. या अपघाताची माहिती कळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेऊन मदत केली.
गोरंबा गावापासून लेगापाणी या गावाकडे जाणाऱ्या वाहनावरील चालकाचा ताबा सुटला. तीव्र उतारावरून हे वाहन खोल दरीत कोसळले. ग्रामस्थांनी बांबूची झोळी करत मृतदेह बाहेर काढले. स्थानिकांच्या मदतीने चारही मृतदेह बाहेर काढण्यात यश आले असून जखमींना तातडीने म्हसावद ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
सातपुडा पर्वत रांगेत गोरंबा ते लेगापाणी दरम्यान घाट रस्ता आहे. या घाटात उताराची, चढाची धोकादायक वळणे आहेत. घाटात रस्ता तयार करताना वळणावर नियमानुसार रस्त्याची निर्मिती केली गेलेली नाही. सुरक्षिततेसाठी आवश्यक असलेले कठडे व तत्सम उपायोजना नसल्यामुळे हा रस्ता मृत्यूचा सापळा बनला आहे. लेगापाणीपासून एका धोकेदायक वळणावर पिकअप वाहन चढत असताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यामुळे हे वाहन मागच्या बाजूला ७०० ते ८०० मीटर अंतरावर जाऊन कोसळले.