पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- समाज कल्याण विभागाकडून ६५ वर्ष वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांचे शारीरिक, मानसिक स्वास्थ्य अबाधित राखण्यासाठी एकरकमी आर्थिक सहाय्य देण्याच्या ‘मुख्यमंत्री वयोश्री’ योजने’चा जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.
ज्येष्ठ नागरिकांना वयोमानपरत्वे येणाऱ्या दिव्यांगत्व, अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्य साधने, उपकरणे खरेदी करण्यासाठी व मनःस्वास्थ्य केंद्र, योगोपचार केंद्राद्वारे त्यांचे मानसिक स्वास्थ्य अबाधित ठेवण्यासाठी ही योजना राबविण्यात येत आहे. या योजनेच्या लाभासाठी लाभार्थ्याचे वार्षिक उत्पन्न २ लाखाच्या आत असणे आवश्यक आहे. यामध्ये पात्र लाभार्थ्याच्या आधार संलग्न वैयक्तिक बँक खात्यावर एकरकमी ३ हजार रूपये थेट लाभ वितरण (डीबीटी) प्रणालीद्वारे प्रदान करण्यात येईल.
लाभ वितरण झाल्यावर या योजनेअंतर्गत विहित केलेली उपकरणे खरेदी केल्याचे तसेच मन:स्वास्थ केंद्राद्वारे प्रशिक्षण घेतल्याचे लाभार्थ्यांचे देयक प्रमाणपत्र ३० दिवसांच्या आत सहायक आयुक्त समाजकल्याण पुणे यांचेकडून प्रमाणित करून संबंधीत केंद्रीय सामाजिक उपक्रम (सीपीएसयु) संस्थेमार्फत विकसित पोर्टलवर ३० दिवसांच्यात आत अपलोड करणे आवश्यक राहिल. अन्यथा लाभार्थ्याकडून सदर रक्कम वसूल करण्यात येईल.
अधिक माहितीसाठी पात्र अर्जदारांनी सहायक आयुक्त, समाजकल्याण कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन स.नं.१०४/१०५, विश्रांतवाडी रोड, पोलिस स्टेशनसमोर, येरवडा पुणे- ०६ (दूरध्वनी क्रमांक ०२०-२९७०६६११ ईमेल-acswopune@gmail.com) वर सपंर्क साधण्याचे आवाहनही सहायक आयुक्त, समाजकल्याण विशाल लोंढे यांनी केले आहे.