इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नवी दिल्लीः दिल्लीच्या अलीपूरमध्ये दोन पेंट आणि रसायनाच्या गोदामांना लागलेल्या आगीत ११ जणांचा मृत्यू झाला, तर चार जण जखमी झाले. मृतांना बाबू जगजीवन राम रुग्णालयात तर चार जखमींना राजा हरिश्चंद्र रुग्णालयात नेण्यात आले आहे. मृतांची ओळख अद्याप पटलेली नाही.
दिल्लीतील अलीपूर येथील पेंट फॅक्टरीला लागलेल्या भीषण आगीच्या घटनेनंतर शोककळा पसरली आहे. या अपघातातील मृतांची ओळख अद्याप पटलेली नाही. मृतांचे मृतदेह पूर्णपणे जळाले आहेत. त्यांची ओळख पटवणेही कठीण होत आहे. अलिपूरमधील पेंट फॅक्टरीचा तो दाट लोकवस्तीचा परिसर आहे. घटनेच्या वेळी कारखान्यात काम सुरू होते. गुरुवारी सायंकाळी आग एवढ्या वेगाने भडकली, की कर्मचाऱ्यांना बाहेर पडण्याची संधी मिळाली नाही. अग्निशमन विभागाचे पथक अपघाताचा तपास करत आहे.
दिल्ली अग्निशमन सेवेच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, ही आग सायंकाळी सव्वा पाच वाजता घडली. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी एक पथक तयार करण्यात आले आहे. अग्निशमन दलाच्या २२ गाड्यांनी चार तासांत ही आग आटोक्यात आणली.