मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– महाराष्ट्र आणि लंडन मधील संबंध अधिक दृढ करण्यासाठी महाराष्ट्र दौऱ्यावर आलेल्या लॉर्ड मेयर ऑफ लंडन मायकल मिलेनी यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. यावेळी झालेल्या बैठकीत मिलेनी यांनी लंडन मधील आर्टीफिशिअल इंटिलिजन्स सेंटरला छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव देण्याचा मानस व्यक्त केला. मिलेनी यांच्या सकारात्मक भूमिकेचे स्वागत करतानाच लंडनमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात यावा अशी मागणी मुख्यमंत्री शिंदे यांनी केली.
वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीस ब्रिटीश उपउच्चायुक्त हरजिंदर कांग, हेन्री ली, अभिजीत देशपांडे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी पर्यावरण, स्वच्छ हवा, आर्टीफिशिअल इंटिलिजन्स, माहिती तंत्रज्ञान याबाबत सविस्तर चर्चा झाली.
महाराष्ट्र आणि लंडनमधील संबंध दृढ असून ते अधिक वृद्धींगत होण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. महाराष्ट्रात गुंतवणुकीला मोठा वाव असून भव्य पायाभूत सुविधा, कुशल मनुष्यबळ असल्याने उद्योजकांनी महाराष्ट्राला पसंती दर्शविल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी सांगितले. मुंबई कोस्टल रोड, अटलसेतू सारखे पायाभूत सुविधांचे प्रकल्प गेमचेंजर ठरणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. यावेळी अटल सेतूवरून प्रवास केल्याचा अनुभव कथन करतानाच तो भव्य आणि दर्जेदार असल्याचे मिलेनी यांनी सांगितले.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्य आणि पराक्रमाची गाथा प्रेरणादायी आहे. लंडन मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी यावेळी मागणी केली. त्याला सकारात्मक प्रतिसाद देतानाच लंडनमधील आर्टीफिशिअल इंटिलिजन्स सेंटरला छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव देण्याच मानस मिलेनी यावेळी व्यक्त केला.