मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अपात्रता प्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज निकाल दिला. त्यात अजित पवार गट हा मूळ राजकीय पक्ष असल्याचे म्हटले आहे. विधीमंडळातील बहुमत अजित पवार गटाकडे असल्याचेही त्यांनी सांगितले. या निकालात अजित पवार गट व शरद पवार गटाचे आमदार अपात्र नसल्याचेही त्यांनी निकालात सांगितले.
अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीचा एक गट राज्यातल्या महायुती सरकारमध्ये सामील झाला. त्यानंतर राष्ट्रवादीत अजित पवार गट आणि शरद पवार गट एकमेकांसमोर आल्यानंतर त्यांनी विधानसभा अध्यक्षांकडे आमदार अपात्र ठरवण्यासाठी याचिका दाखल केल्या होत्या. त्यावर आज निकाल दिला आहे. या दोन्ही गटांकडून एकमेकांविरोधात आमदार अपात्रता याचिका दाखल केल्या होत्या. या याचिकांवर विधानसभा अध्यक्ष नार्वेकरांसमोर सुनावणी झाली. साक्ष नोंदणी, उलटतपासणी आणि अंतिम युक्तिवादानंतर ३१ जानेवारी रोजी सुनावणीचे कामकाज संपले. त्यानंतर आज या याचिकांवरील निकाल देण्यात आला.
दरम्यान काही दिवसांपूर्वी केंद्रीय निवडणूक आयोगाने अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील पक्षच मूळ राष्ट्रवादी काँग्रेस असल्याचा निकाल दिलेला आहे. त्याला शरद पवार यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.