इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
अहमदनगर : नगर जिल्ह्यातील पारनेर येथे शिवसेनेचे नगरसेवक युवराज पठारे यांच्यावर गोळीबार करून त्यांना संपवण्याचा प्रयत्न अल्पवयीन युवकाने केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. परंतु पठारे यांच्यासोबतच्या एका युवकाने प्रसंगावधान बाळगल्याने पठारे बालंबाल बचावले.
एका हॉटेलमध्ये पठारे आले असताना एका युवकाने पूर्ववैमनस्यातून पठारे यांच्यावर हल्ला झाला. त्याने पठारे यांच्या छातीवर गावठी कट्टा लावला. गोळी झाडली; परंतु आवाज होऊनही गोळी सुटली नाही. तोपर्यंत नगरसेवक पठारे आणि त्यांचे अन्य सहकारी सावध झाले. गोळी अडकल्यानंतर संबंधित युवकाने चाकूने हल्ला केला. या हल्ल्यातून पठारे थोडक्यात बचावले.
हा आरोपी बहुरूपी वाटल्याने त्याच्याकडे गांभीर्याने पाहिले नाही. त्यांनी त्याची मस्करी केली. त्याने गोळी झाडण्याचा प्रयत्न केल्यानंतर सर्व झाले. त्याने पहिली गोळी झाडली; परंतु ती आत अडकली. तो दुसऱ्यांदा प्रयत्न करण्यापूर्वी भरत गट यांनी त्याच्या हातातून गावठी कट्टा हिसकावला. या घटनेची माहिती मिळताच नगरसेवक पठारे यांच्या समर्थकांनी पारनेर पोलिस ठाण्यात गर्दी केली. जमावाने हल्लेखोरास बेदम चोप दिला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. अल्पवयीन हल्लेखोर पारनेरमध्ये महाविद्यालयात शिकतो आहे. महाविद्यालयीन तरुणाने गावठी कट्टा कुठून आणला याचा पोलिस शोध घेत आहेत. या तरुणासोबत असणारे इतर दोन तरुणांनी पळ काढला. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून आता पळून गेलेल्या दोघांचा पारनेर पोलिस शोध घेत आहेत. पकडलेला हल्लेखोराने मी एकटाच होतो, असे सांगितले आहे.