नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– अमली पदार्थ विक्रीवर सक्त कारवाई केल्यानंतर पुन्हा हा अवैध व्यवसाय सुरु असल्याचे समोर आले आहे. मॅफेड्रान तथा एमडी या अमली पदार्थाची विक्री करणा-या तरूणास पोलीसांनी गजाआड केले आहे. संशयिताच्या ताब्यातून सुमारे ८७ हजार ५०० रूपये किमतीचा एमडी पुड्या हस्तगत करण्यात आल्या असून त्याने हा पदार्थ कोठून आणला याबाबत पोलीस शोध सुरू आहे. याबाबत आडगाव पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
धम्मराज उर्फ सागर बाळासाहेब शार्दुल (१८ रा.राजवाडा,म्हसरूळ) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. याबाबत अंमलदार विलास चारोस्कर यांनी फिर्याद दिली आहे. आडगाव शिवारातील हनुमान नगर कडे जाणा-या मार्गावर एक तरूण एमडीची विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती शहर गुन्हे शाखेच्या युनिट १ च्या पथकास मिळाली होती. त्यानुसार बुधवारी (दि.१४) पथकाने सापळा लावला असता हॉटेल पेशवा मागे संशयित पोलीसांच्या जाळयात अडकला.
दुचाकीस्वार संशयिताच्या अंगझडतीत सुमारे ८७ हजार ५०० रूपये किमतीच्या मॅफेड्रॉनने भरलेल्या पाऊच मिळून आल्या. संशयितास बेड्या ठोकत पथकाने मुद्देमाल हस्तगत केला असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक अश्विनी पाटील करीत आहेत.