नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) –१० ते १२ फेब्रुवारी, दरम्यान सांगली येथे आयोजित महाराष्ट्र राज्य स्तरीय मैदानी (अँथलेटिक्स) स्पर्धेत नाशिकच्या व्ही.डी. के.स्पोर्ट्स फाउंडेशनच्या खेळाडूंनी सुंदर खेळाचे प्रदर्शन करून पदकांची कमाई केली.
स्पर्धेमध्ये मुलींच्या बारा वर्षे वयोगटात ३०० मीटर धावणे या खेळ प्रकारात सरोज काळे हीने सर्वात जास्त वेगवान धाव घेत सुवर्ण पदकावर आपले नांव कोरले. याच खेळ प्रकारात त्र्यंबकेश्वरच्या सिया कडलक हिनेही कास्यपदक पटकावले. ८ वर्षे वयोगटात मुलांमध्ये आहान राव याने ५० मीटर धावणे या खेळ प्रकारात कांस्यपदक पटकावले. १२ वर्षे वयोगटात लांब उडी या खेळ प्रकारात राजवीर मालसाने याने कास्य पदकाची कमाई केली. हे सर्व पदक विजेते खेळाडू गंगापूर रोड येथील सी. एम. सी. एस. कॉलेजच्या मैदानावर रोज सकाळ-संध्याकाळ दोन तास मार्गदर्शक बालाजी शिरफुले आणि वैजनाथ काळे यांच्या मार्गदर्शनाखाली नियमित सराव करतात.
खेळाडूंच्या या उत्तम कामगिरीबद्दल नाशिक जिल्हा अँथलेटिक्स असोसिएशनचे अध्यक्ष हेमंत पांडे, सेक्रेटरी सुनील तावरगिरी, सी. एम. सी. एस. कॉलेजचे प्राचार्य डॉ. रवींद्रकुमार पाटील यांनी सर्व विजेत्या खेळाडूंचे अभिनंदन केले.