वंदना वेदपाठक, इंडिया दर्पण वृत्तसेवा
बॉलिवूडचा खिलाडी कुमार म्हणजेच अक्षय कुमार अबुधाबीला पोहोचला असून तेथील आजच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन झालेल्या स्वामी नारायण मंदिरात त्याने दर्शन घेतले. बोचासनवासी अक्षर पुरुषोत्तम स्वामीनारायण संस्थेने (BAPS) अबु मुरेखा या भागात मंदिर उभारले आहे. या भव्य मंदिराचं सर्वांनाच आकर्षण आहे. संयुक्त अरब अमिरातमध्ये हे पहिलंच हिंदू मंदिर उभारण्यात आले आहे.
बुधवारी या मंदिराचं उद्घाटन नरेंद्र मोदींच्या हस्ते झालं तेव्हा सर्वच भारतीयांना अभिमान वाटला. आणि आता खिलाडीही तिथे पोहोचल्याने चाहत्यांना आनंद झाला आहे. अबुधाबीतील या मंदिर परिसरात जय श्री रामचा गजर होतानाचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
अयोध्या राम मंदिर उद्घाटनासाठी आमंत्रण असूनही अक्षय कुमार पोहोचू शकला नव्हता. त्यावेळी तो जॉर्डनमध्ये शूटिंग करत होता. मात्र आता अबुधाबीच्या या पहिल्या हिंदू मंदिरात त्याने आवर्जुन हजेरी लावली. अबुधाबीचे BAPS स्वामीनारायण मंदिर १०८ फूट उंच, २६२ फूट लांब आणि १८० फूट रुंद आहे. ही तयार करण्यासाठी ७०० कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. मंदिराच्या बांधकामात केवळ चुनखडी आणि संगमरवरी वापरण्यात आला आहे. मंदिराच्या बांधकामासाठी ७०० कंटेनरमध्ये २० हजार टन पेक्षा जास्त दगड आणि संगमरवरी अबुधाबीला आणण्यात आले होते.