नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- जुने नाशिक परिसरातील गजराजचौकात भरदिवसा झालेल्या घरफोडीत चोरट्यांनी सुमारे ३० हजाराच्या ऐवजावर डल्ला मारला. त्यात रोकडसह सोन्याचांदीच्या दागिण्यांचा समावेश आहे. याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सोमनाथ सुभाष घोलप (रा. घ.नं.२२२७ परदेशीवाडा,मधली होळी) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. घोलप कुटूबिय सोमवारी (दि.१२) दुपारच्या सुमारास अल्पशा कामानिमित्त घराबाहेर पडले असता ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडून कपाटात ठेवलेली रोकड व अलंकार असा सुमारे ३० हजार ३५० रूपयांचा ऐवज चोरून नेला. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक खांडवी करीत आहेत.
किरकोळ कारणातून टोळक्याने दोघा मित्रांना बेदम मारहाण
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- धक्का लागल्याच्या किरकोळ कारणातून टोळक्याने दोघा मित्रांना बेदम मारहाण केल्याची घटना रामकुंड भागात घडली. या घटनेत लोखंडी रॉड व धारदार शस्त्राचा वापर करण्यात आल्याचने एक तरूण जखमी झाला असून याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भिमा उर्फ विवेक मौर्या, यश शिंदे, सक्षम पाटील व प्रथमेश बनसोडे अशी दोघा मित्रांना मारहाण करणा-या संशयित टोळक्यातील सदस्यांची नावे आहेत. याबाबत नितीन बाळासाहेब जानराव (२३ रा.बजरंगनगर,आनंदवली) या युवकाने फिर्याद दिली आहे. जानराव व प्रेम नाना साळवे (२२ रा. आनंदवली राजवाडा,गंगापूर) हे दोघे मित्र सोमवारी (दि.१२) रात्री गोदाघाटावर गेले असता ही घटना घडली. दोघे मित्र रस्त्याने पायी जात असतांना धक्का लागल्याच्या कारणातून संशयित टोळक्याने त्यांना दमदाटी करीत बेदम मारहाण केली. या घटनेत लोखंडी रॉड व धारदार शस्त्राचा वापर करण्यात आल्याने प्रेम साळवे हा जखमी झाला असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक गावित करीत आहेत.