इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नागपूर – देशाच्या सर्वसमावेशक विकासाचा पाया चांगल्या रस्त्यांच्या माध्यमातून रचला जातो. रस्ते झाले की उद्योग येतात, गुंतवणूक वाढते, त्यातून रोजगार निर्मिती होते आणि गरिबी कमी होण्यास मदत होते, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केले.
भाजप महाराष्ट्राच्या परराष्ट्र व्यवहार विभागाच्या वतीने अलीकडेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासोबत ‘लीडर्स कनेक्ट विथ ग्लोबल महाराष्ट्रीयन डायस्पोरा’ या आभासी संवाद उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी गडकरी बोलत होते. ते म्हणाले, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०२५ पर्यंत आपला देश ५ ट्रिलियन अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट्य गाठेल, असा विश्वास व्यक्त केला आहे. त्यादृष्टीने सर्वसमावेशक विकासाच्या दिशेने पाऊल उचलण्यात आले आहे.
गरीब, महिला, युवा आणि शेतकरी या चार घटकांच्या कल्याणाचा विचार ठेवून काम सुरू आहे. यामध्ये पायाभूत सुविधा अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत असतात. त्यामुळेच यंदाच्या अर्थसंकल्पात पायाभूत सुविधांसाठी ११.११ लाख कोटी रुपयांचा निधी प्रस्तावित केलेला आहे.’ भारताच्या पायाभूत सुविधांच्या विकासासाठी तसेच राष्ट्रीय महामार्गासारख्या प्रकल्पांमध्ये गुंतवणूक किंवा भागीदारी करून अनिवासी भारतीय देशाच्या यशोगाथेत योगदान देऊ शकतात, असेही नितीन गडकरी म्हणाले. भाजप महाराष्ट्रचे परराष्ट्र विभाग प्रभारी गौरव पटवर्धन, राष्ट्रीय प्रभारी डॉ. विजय चौथाईवाले, सहप्रभारी राधिका देशमुख यांच्यासह विविध मान्यवरांची उपस्थिती होती.