नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – बिटको रूग्णालयात उपचार करण्यास दिरंगाई केल्याच्या कारणातून दोन जणांनी डॉक्टरला शिवीगाळ करीत धक्काबुक्की केल्याची घटना घडली. याप्रकरणी शासकिय कामात अडथळा आणल्याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन संशयितांना पोलीसांनी अटक केली आहे.
रेहमान जाफर शेख (२४ रा.अमरधाम राजवाडा,नाशिकरोड) व समित प्रकाश भायदोडे (२२ रा.बौध्दनगर,देवळाली गाव) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. याबाबत डॉ. हेमंत काळे यांनी फिर्याद दिली आहे. शेख व भायदोडे सोमवारी (दि.१२) दुपारच्या सुमारास मनपाच्या हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे तथा बिटको रूग्णालयात गेले होते.
ड्रेसिंगरूममध्ये उपस्थित डॉ. काळे यांच्याशी त्यांनी उपचार करण्यास दिरंगाई केल्याने वाद घातला. संतप्त दुकलीने लगेच उपचार करा असा आग्रह धरीत फुकट पगार घेता का असे म्हणत त्यांना शिवीगाळ व दमदाटी करीत धक्काबुक्की केली. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक जगताप करीत आहेत.