नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– कोण कशी फसवणूक करेल हे सांगत येत नाही. नाशिकच्या एका बांधकाम व्यवसायासाठी कर्ज प्रकरण मंजूर करून देण्याच्या बहाण्याने तब्बल साडे पस्तीस लाख रूपयांना असाच गंडा घातल्याच प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी शहरातील एकासह मुंबईच्या महिलेविरोधात भद्रकाली पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार व्हि.जी.इनोक (रा.जेलरोड) व गितांजली पटेल (रा.अंधेरी मुंबई) अशी गंडा घालणा-या संशयितांची नावे आहेत. याप्रकरणी श्रीपाद काशिनाथ सोमासे (रा.वृंदावननगर,म्हसरूळ) यांनी फिर्याद दिली आहे. सोमासे यांना २०१७ मध्ये बांधकाम व्यवसायासाठी कर्ज पाहिजे होते. त्यामुळे त्यांनी जेलरोड भागात राहणा-या संशयित इनोक याच्याशी चर्चा केली असता त्याने संशयित महिला कर्ज मंजूर करून देईल अशी ग्वाही देत ३० डिसेंबर रोजी शहरातील सीबीएस बसस्थानक परिसरातील हॉटल प्रिया येथे भेट घडवून आणली होती.
यावेळी मोठ्या रकमेच्या कर्ज मंजूर करून देण्याची ग्वाही देण्यात आल्याने सोमासे यांचा विश्वास बसला. त्यानंतर मात्र दोघा संशयितांनी वेगवेगळे बहाणे करून सोमासे यांना गंडविले आहे. तब्बल ३५ लाख ६० रूपयांची रक्कम संशयिताच्या बँक खात्यात भरण्यास सोमासे यांना भाग पाडण्यात आले असून आरटीजीएसच्या माध्यमातून ही रक्कम वर्ग करण्यात आली आहे. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक सोनवणे करीत आहेत.