इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
भाजपने राज्यसभेच्या उमेदवारांची यादी जाहीर केली असून त्यात माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, माजी मेधा कुलकर्णी आणि अजित गोपछडे यांना संधी दिली आहे. याअगोदर या तीन जागेसाठी नारायण राणे, विनोद तावडे व पंकजा मुंडे यांच्याबरोबरच अनेक नावाची चर्चा होती. पण, भाजपने पुन्हा धक्कातंत्र वापरत ही नवी नावे जाहीर केली आहे.
काँग्रेसला सोडून २४ तास उलटत नाही तोच माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना उमेदवारी देण्यात आली. त्याचप्रमाणे माजी आमदार मेधा कुलकर्णी यांची नाराजी दूर करण्यात आली आहे. त्यांना गेल्या विधानसभा निवडणुकीत उमेदवारी न देता चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी पुण्यातून दिली होती. त्यामुळे त्यांना संधी देण्यात आली. तर अजित गोपछडे हे विदर्भातील जुने कार्यकर्ते आहे. अनेक वर्षापासून ते भाजपमध्ये सक्रिय आहे.
याअगोदर राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गट तसेच शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाने निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतल्याने महाराष्ट्रातील राज्यसभेच्या सहा जागांची निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता वर्तवली होती. पण, भाजपने चौथ्या जागेसाठी हालचाली सुरु केल्यामुळे आता ही निवडणूक कशी होते याकडे लक्ष लागले आहे.
या सहा जागापैकी भाजप तीन, राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार गट, शिवसेनेचा शिंदे गट आणि काँग्रेस प्रत्येकी एक अशा जागा वाटून घेऊन निवडणूक बिनविरोध होऊ शकते. महायुतीच्या वाट्याला पाच जागा तर महाविकास आघाडीला एक जागा मिळू शकते. पण, चौथा उमेदवार भाजपने उभा केल्यास निवडणूक रंगणार आहे. येत्या २७ तारखेला राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक होणार आहे.
भाजपने राज्यसभेच्या उमेदवारांची चाचपणी सुरू केल्यानंतर विनोद तावडे यांच्यासोबतच पंकजा मुंडे आणि विजया रहाटकर यांना राज्यसभेवर पाठवण्याची चर्चा होती. त्यात राष्ट्रीय सरचिटणीस म्हणून विनोद तावडे यांनी चंदीगड आणि बिहारच्या सत्तांतरात बजावलेली भूमिकेची बक्षिसी त्यांना मिळणार असल्याचे बोलले जात होते. आरक्षणाच्या मुद्द्यावरून भाजपवर नाराज असलेल्या ओबीसी समजाची नाराजी दूर करण्यासाठी पंकजा यांना उमेदवारी दिली जाणार असल्याचे म्हटले जात होते. पण, ही चर्चाच ठरली. शिवसेना शिंदे गटाकडून मिलिंद देवरा यांना, तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाकडून पार्थ पवार किंवा अल्पसंख्याक समाजातील चेहऱ्याला संधी देण्याची शक्यता आहे.