इंडिाय दर्पण ऑनलाईन डेस्क
लखनऊः लग्नात कोणत्या कारणाने वाद होईल हे सांगता येत नाही. रुसवे फुसवे तर बहुतांश लग्नात असतात. पण, रसगुल्ला संपल्याच्या अफवेने उत्तर प्रदेशच्या अलीगढजवळच्या एका लग्नसमारंभात थेट मारामारी झाली. या लग्नात जेवणातील रसगुल्ला संपल्याची अफवा पसरली आणि त्यानंतर लग्नघरात धुमश्चक्री झाली. दोन पक्षांदरम्यान एका मुद्यावरून वाजले आणि मारामारी झाली.
ही घटना सासनीगेट पोलिस ठाण्याच्या हद्दीतील भुजपुरा येथे घडली. या हॉलमध्ये लग्न होते. आनंदाचे वातावरण असताना अचानक रसगुल्ला संपल्याची अफवा पसरली. अवघ्या काही सेकंदात लग्नमंडपातील वातावरण बदलले. वर-वधू पक्षाच्या लोकांनी एकमेकांना जाब विचारला. त्यातून शब्दाने शब्द वाढला. काही वेळातच हा वाद इतका वाढला, की दोन्ही बाजूंनी हाणामारी झाली. त्यात महिलांचाही सहभाग होता. समोर जे दिसेल ते उचलून लोक एकमेकांना मारीत सुटले. एवढेच नव्हे, तर लोकांनी खुर्च्या फेकून मारल्या.
वधूचा भाऊ आणि वहिनी यांच्यात आधीपासून वाद होता. ते पती-पत्नी दोघे वेगळे राहतात; मात्र बहिणीच्या लग्नासाठी भाऊ आल्याचे समजताच त्याची पत्नी आणि भाऊ समोरासमोर आले. आधी त्यांच्यात बाचाबाची झाली. नंतर वाद टोकाला गेल्यावर हाणामारी झाली. काही मोठ्या मंडळींनी मध्यस्थी करत हे भांडण मिटवले.