इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
सांगली : राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्ताने महाराष्ट्रातील सर्वात मोठी बैलगाडी शर्यत आयोजित करण्यात आली आहे. बैलगाडी शर्यत जिंकणारया बैल मालकाला चक्क वन बीएचके फ्लॅट मिळणार आहे.
कासेगावमध्ये ही बैलगाडी शर्यत होणार आहे. आतापर्यंत बैलगाडी विजेत्याला थार गाडी आणि लाखोंचे बक्षीस देण्यात आली आहेत; मात्र या वेळी जयंत केसरी बैलगाडी स्पर्धेतील विजेत्यास चक्क वन बीएचके फ्लॅट बक्षीस आहे. जयंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त १७ तारखेला ही बैलगाडी शर्यत होणार आहे.
या स्पर्धेतील दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाच्या विजेत्या बैलगाडीला सात आणि पाच लाख रुपयांचे बक्षीस आहे. महाराष्ट्रासह कर्नाटक, मध्य प्रदेश राज्यातून दोनशेहून अधिक बैलगाडी स्पर्धक या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. शर्यतीसाठी दहा एकराचे मैदान तयार करण्यात आले आहे. त्यात एक लाख प्रेक्षकांची आसन व्यवस्था करण्यात आली आहे. जयंत पाटील यांच्या नावाने गेल्या वर्षी जयंत केसरी ही बैलगाडा शर्यत सुरू केली.