पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार असल्याची जोरदार चर्चा सुरु होती. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी पक्षातील सर्व आमदार आणि खासदारांची बैठक बोलावली आहे. त्यात हा निर्णय होण्याची शक्यता असल्याचे बोलले जात होते. पण, त्यानंतर ही चर्चा फेटाळली आहे.
विलीकरणाबाबत शरद पवार गटाकडून अगोदर दुजोरा देण्यात आला होता. शरद पवार गटाचे नेते मंगलदास बांदल यांनी यावर बोलतांना सांगितले की, हा राष्ट्रीय पातळीवरचा निर्णय़ आहे. तो वरीष्ठ नेते घेतील. पण, चर्चा सुरु आहे. त्यानंतर बैठक संपल्यानंतर राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांनी ही केवळ अफवा असून आम्ही येणारी निवडणूक ही राष्ट्रवादीच्या चिन्हांवरच लढवणार असल्याचे सांगितले.
पुण्यातील मोदी बागेत ही बैठक होते. या बैठकीत शरद पवार गटाचे प्रमुख नेते उपस्थितीत आहे. राज्यात शिवसेना व राष्ट्रवादीत फुट झाल्यानंतर आता काँग्रेसलाही गळती सुरु झाली आहे. त्यामुळे या राजकीय घडामोडीत शरद पवार गटाने विचारमंथन सुरु करुन काँग्रेसमध्ये जाण्याचे जवळपास निश्चित केल्याचे बोलले जात होते. पण, ही अफवाच ठरली.
काँग्रेसने दिला होता प्रस्ताव
महाविकास आघाडीचे अस्तित्त्व टिकवण्यासाठी काँग्रेस हायकमांडकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार यांना एक मोठा प्रस्ताव देण्यात आला आहे. शरद पवार यांनी त्यांचा गट काँग्रेसमध्ये विलीन करुन काँग्रेससह एकाच चिन्हावर निवडणूक लढवावी, असा काँग्रेस हायकमांडचा प्रस्ताव आहे. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी हा प्रस्ताव शरद पवार यांच्यासमोर मांडल्याचे समजते.